News Flash

कर्जवाढीच्या चिंतेतून मूडीजकडून चीनवर ‘पत’झडीचा वार!

तीन दशकांत पतमानांकन संस्थांची पहिलीच नकारात्मक ‘लाल फुली’

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

तीन दशकांत पतमानांकन संस्थांची पहिलीच नकारात्मक लाल फुली

अर्थव्यवस्थेच्या आकारमानएवढा वाढलेल्या कर्जभाराबद्दल चिंता व्यक्त करीत, आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था मूडीज्ने चीनच्या पतमानांकनात कपातीचा बुधवारी निर्णय घेतला. चीनची अर्थव्यवस्था घसरणपंथाला लागली असल्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावरून दिला गेलेला पहिला ठोस संकेत असून, त्याचे विपरीत पडसाद स्थानिक भांडवली बाजार व चलनाच्या मूल्यावर उमटलेले दिसून आले.

मूडीज्ने चीनचे पतमानांकन एका पायरीने कमी करून एए३ वरून ए१ असे कमी केले. तथापि तेथे सुरू असलेल्या सद्य: सुधारणा या जोखीम संतुलित असल्याचे नमूद करून या आंतरराष्ट्रीय संस्थेने चीनबद्दल दृष्टिकोनात ‘नकारात्मक’वरून ‘स्थिर’ अशी सुधारणा करीत असल्याचे स्पष्ट केले आहे. तिएनान्मेन चौकातील चिरडले गेलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर चीनचे पतमानांकन आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थांनी कमी केले होते, त्यानंतर जवळपास तीन दशकांनंतर चीनबाबत नकारात्मक कौल पतमानांकन संस्थांनी दिला आहे. उल्लेखनीय म्हणजे चीन आणि भारताचे पतमानांकन निर्धारित करताना, आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था दुजाभाव करतात, असा आशयाचा आरोप भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यन यांनी अलीकडेच जाहीरपणे केला आहे.

चीनने अलीकडच्या काळात जागतिक वित्तीय स्थिरतेसाठी संभाव्य बाधा ठरतील अशा विषाक्त स्वरूपाच्या, कोणाचेही नियंत्रण नसलेल्या व धोकादायक पतपद्धतींविरुद्ध जोरदार सफाई मोहीम सुरू केली आहे. तरीही चीनला, विशेषत: तेथील राजकीय व्यवस्थेला आपल्या सत्तेसाठी राजकीय समर्थन मिळविण्यासाठी कर्ज-उचलीचे व्यसन जडले असून, मंदावलेली अर्थवृद्धी कर्जवाढीच्या इंधनाने पोसली जाईल, याबाबत विश्लेषकांमध्ये एकमत आहे. त्यामुळे आधीच भयानक रूप धारण केलेल्याने कर्जभाराचे चीनच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम दिसतील, यामुळेच पतमानांकनात ही कपात केली गेली आहे.

चिनी बाजारपेठेत पडझड आणि सुधारही!

‘पत’झडीच्या वृत्ताचे चीनच्या भांडवली बाजारात भयानक पडसाद उमटले. शांघाय कम्पोझिट हा तेथील प्रमुख निर्देशांक एक टक्क्यांनी गडगडून ऑक्टोबर २०१६ मधील नीचांकाला गवसणी घालताना दिसून आला. तेथील चलन तसेच वस्तू वायदा बाजारपेठेत तीव्र स्वरूपाची पडझड दिसून आली. तथापि, भांडवली बाजार घसरणीतून सावरतानाही दिसले. मूडीजने एका पायरीने पतमानांकनात कपात करूनही, ए१ ही सद्य जगातील पाचवे सर्वोच्च मानांकन आहे. विशेषत: रोखे बाजारात चिनी संस्थांगत गुंतवणूकदारांचा वरचष्मा असून, मूडीज्च्या या पतझडीचा पूर्वअंदाज त्यांना होता आणि प्रत्यक्ष निर्णय त्यांच्या दृष्टीने फारसा धक्कादायक ठरला नाही, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2017 2:11 am

Web Title: moodys cuts china rating international credit agency
Next Stories
1 गृहनिर्माण संस्थांना स्मार्ट तोंडावळा
2 स्मॉल-मिड कॅप समभागांत पडझड सुरूच!
3 भांडवली बाजारात विक्रीला जोर; सेन्सेक्स, निफ्टीत मोठी घसरण!
Just Now!
X