नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेला आर्थिक मंदीतून सावरण्यासाठी सुरू असलेल्या सरकारच्या उपाययोजनांचा आणखी एक फेऱ्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. केंद्र सरकार अथवा रिझव्‍‌र्ह बँकेच्या माध्यमातून हा दिलासा येत्या काही दिवसांत दिला जाण्याची शक्यता आहे.

केंद्रीय अर्थमंत्रालयाचे प्रधान आर्थिक सल्लागार संजीव सन्याल यांनी मंगळवारी, अर्थविकासासाठी रिझव्‍‌र्ह बँक ऑक्टोबरमधील नियोजित पतधोरण बैठकीत उपाययोजना करेल, असे संकेत देत व्याज दरकपातीची शक्यता वर्तवली.

अर्थव्यवस्था वाढीचा दर ५ टक्के असा सहा वर्षांच्या तळात गेल्याच्या पाश्र्वभूमीवर आणखी प्रोत्साहनपूरक पावले टाकली जातील, असे केंद्रीय अर्थ खात्यातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले. या संबंधी आराखडा तयार असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन  लवकरच तो जाहीर करतील, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनीही गेल्याच आठवडय़ात, सरलेल्या तिमाहीत पाच टक्क्य़ांपर्यंत घसरलेला आर्थिक विकास दराचा आकडा हे धक्कादायक  असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्या पश्चात तीन टप्प्यात सरकारने केलेल्या उपाययोजनांना येत्या कालावधीत आणखी जोड मिळेल, असे त्यांनीही नमूद केले आहे.