२०, २३ व २४ कॅरेटच्या सोन्यासाठीही हॉलमार्क बंधनकारक

मुंबई : सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्क अनिवार्य करण्याबाबतचा आदेश ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण खात्याने जाहीर केला आहे. याचबरोबर याबाबतचे काही र्निबध शिथिलदेखील करण्यात आले आहेत.

मौल्यवान धातूच्या शुद्धतेसाठी २०, २३ व २४ कॅरेटच्या सोन्यासाठीही हॉलमार्क बंधनकारक करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात देशातील काही जिल्ह्य़ांमध्ये नव्या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. हॉलमार्क अनिवार्यतेतून वार्षिक ४० लाख उलाढाल असलेल्या सराफ पेढय़ांना वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय प्रदर्शने, देशांतर्गत मात्र सरकारमान्य व्यावसायिकांदरम्यान भरणाऱ्या प्रदर्शन, घडय़ाळे – फाऊंटन पेन – कुंदन – पोलकी – जडाऊ आदींसाठीच्या दागिन्यांना हॉलमार्क बंधनकारक नसेल.

हॉलमार्क बंधनकारक करण्यात आले असले तरी त्याची अंमलबजावणी न करणाऱ्यांना ३१ ऑगस्टपर्यंत दंड न आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दागिने निर्माते, घाऊक विक्रेते तसेच किरकोळ विक्रेते यांना काही कालावधीसाठी दिलासा मिळणार आहे. सुरुवातीला १५ जानेवारीपर्यंत देण्यात आलेली हॉलमार्क सक्तीची मुदत १ जूनपर्यंत विस्तारण्यात आली होती. त्यानंतर ती १५ दिवसांसाठी विस्तारण्यात आली.

मौल्यवान धातूच्या शुद्धतेवरील अधिकृत मोहोर-त्यासाठी नियुक्त केंद्रामार्फत अशा दागिन्यांची तपासणी केली जाते. सोन्यासाठी ओळखले जाणाऱ्या दुबईबरोबरच ब्रिटनसारख्या काही देशांत हॉलमार्क सक्तीचे आहे. भारतात सध्या जवळपास २५६ जिल्ह्य़ांमध्ये अशा प्रयोगशाळा आहेत. ‘ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड’मार्फत ही प्रक्रिया राबवली जाते.

भारत हा सोने वापराबाबत चीननंतरचा दुसरा देश आहे. जानेवारी ते मार्च २०२१ दरम्यान देशात सोन्याची मागणी १४० टन नोंदली गेली आहे. भारतीय मौल्यवान धातू बाजारपेठेत वर्षांला १,००० टनपर्यंत व्यवहार होतात. सध्या देशात ३० टक्के दागिनेच हॉलमार्क असलेले आहेत.