पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०२० पर्यंत देशाचे इंधन आयात अवलंबित्व १० टक्क्य़ांनी कमी करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देशांतर्गत तेल व वायू उत्पादनावर भर देण्यात येणार असल्याची माहिती या खात्याचा केंद्रीय राज्यमंत्री या नात्याने स्वतंत्र कार्यभार पाहणाऱ्या धर्मेद्र प्रधान यांनी दिली. याचाच एक भाग म्हणून मुंबई नजीकच्या सागरी पट्टय़ात सापडलेल्या आणखी पाच इंधन साठय़ातून चालू आर्थिक वर्षांदरम्यानच तेल उत्सर्जन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
तेलाबाबत भारताचे आयातीवरील अवलंबित्व २०२२ पर्यंत १० टक्क्यांनी कमी करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ओएनजीसी संचालित ‘मुंबई हाय’मधील इंधन उत्सर्जन वाढविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पेट्रोलियम व  नैसर्गिक वायूमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या समयी बोलताना केले. ‘बॉम्बे हाय’मधील देशातील एकूण इंधन उत्पादनापैकी ४० टक्के उत्पादन होते.
ओएनजीसीच्या ‘बॉम्बे हाय’चे इंधन उत्सर्जनाच्या दृष्टीने दक्षिण व उत्तर असे भाग समुद्रात पडतात. मात्र या दोहोंदरम्यान मधल्या पट्टय़ातही इंधनसाठा मोठय़ा प्रमाणात उपलब्ध असल्याचा दावा त्यांनी ओएनजीसीच्या अंतर्गत संशोधन अहवालाच्या जोरावर केला. चालू आर्थिक वर्षांसाठी मुंबई समुद्रपट्टय़ातील पाच भाग नव्या इंधन उत्सर्जनासाठी निश्चित केल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली.
भारतीय तेल व वायू क्षेत्र सध्या उत्सर्जनाचे अर्धशतक साजरे करत असून २०५० पर्यंत भारताला या क्षेत्रात स्वयंपूर्ण बनविण्याचे केंद्रातील लोकशाही आघाडी सरकारचे लक्ष्य असल्याचेही ते या वेळी म्हणाले. याचाच एक भाग म्हणून भारत अमेरिकानजीकच्या समुद्रातील तेल व वायू उत्सर्जन प्रक्रियेत भाग घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. येत्या महिन्यातील आपल्या मेक्सिको भेटीत याला मूर्त रूप मिळेल, असा विश्वासही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
भारतामार्फत सर्वाधिक होणारी विदेशी गुंतवणूक ही तेल व वायू उत्सर्जनात असून एकटय़ा मोझ्ॉम्बिक प्रांतात आतापर्यंत ६ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यात आली आहे व आणखी त्याच प्रमाणात भविष्यातही गुंतवणूक केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रीय उत्सर्जन     धोरणाच्या १०व्या टप्प्याला लवकरच प्रारंभ केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
अन् प्रधान यांची इच्छापूर्ती..
गेल्या वर्षभरापासून ओएनजीसीचे भर समुद्रातील तेल व वायू उत्सर्जन केंद्र अनुभवण्याची आपली इच्छा होती, असे आवर्जून सांगत केंद्रीय मंत्री प्रधान यांनी तब्बल २४ तास मुंबईनजीक अरबी समुद्रातील ओएनजीसीचालित ‘मुंबई हाय’वर गुरवारचा दिवस व्यतित केला. यानंतर केंद्रीयमंत्री या नात्याने मुंबईत पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांना सामोरे जाताना त्यांनी आपल्या या इच्छापूर्तीची कबुलीही दिली. त्यांच्याबरोबर तेल मंत्रालयाचे (उत्सर्जन) संयुक्त सचिव यू. पी. सिंह, ओएनजीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डी. के. सराफ, सार्वजनिक कंपनीचे संचालक (ऑफशोअर) टी. के. सेनगुप्ता व संचालक (उत्सर्जन) ए. के. द्विवेदी आदी उपस्थित होते. २००५ मध्ये समुद्रातील एका दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या ओएनजीसीच्या कर्मचाऱ्यांनाही त्यांनी या वेळी श्रद्धांजली अर्पण केली.