‘सेन्सेक्स’च्या तुलनेत २०१६ मध्ये सरस कामगिरी

मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक असलेल्या सेन्सेक्सच्या तुलनेत सोने आणि चांदीतील गुंतवणुकीतून चालू वर्षांत आतापर्यंत अधिक परताव्याची नोंद झाली आहे.

२०१६ मध्ये १० ऑक्टोबपर्यंत सेन्सेक्स अवघ्या ७.५२ टक्क्यांपर्यंत वाढला असताना मौल्यवान धातूतील गुंतवणुकीतून मात्र तब्बल २८ टक्क्यांपर्यंत लाभ झाला आहे. या कालावधीत सोने तसेच चांदीचे दर अनुक्रमे १९.७७ व २८.२७ टक्क्यांनी वाढले आहेत. ऐन दसऱ्याच्या तोंडावर मात्र मौल्यवान धातूंमध्ये जागतिक बाजाराचा परिणाम झाल्याने दरनरमाई राहिली आहे. सोने आता तोळ्यासाठी ३० हजाराच्या तर चांदी सध्या किलोमागे ४३ हजार रुपयांपेक्षा कमी स्तरावर आहे. सोने डिसेंबर २०१५ अखेरीस २५,४०० रुपये (१० ग्रॅमसाठी) तर चांदी ३३,३०० रुपये (एका किलोकरिता) होती. सोने धातूने गेल्या १५ वर्षांत १२ वेळा सकारात्मक गुंतवणूक परतावा दिला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेल दरातील चढ-उतार तसेच चिनी अर्थव्यवस्थेपोटी येथील भांडवली बाजारांमध्ये २०१६ च्या सुरुवातीला मोठी घसरण झाली होती. अर्थसंकल्पामुळे मार्चमध्ये बाजारातील नुकसान काही प्रमाणात भरून निघाले होते. या वाढीत गेल्या महिन्यापर्यंत सातत्य होते. २०१६ मध्ये १० ऑक्टोबपर्यंत सेन्सेक्स ७.५२ टक्क्यांनी वाढला आहे. सोमवारी मुंबई निर्देशांक २८ हजारापुढे होता. गेल्या महिन्यात (८ सप्टेंबर) सेन्सेक्सने २९,०७७.२८ असा त्याचा वर्षभरातील सर्वाधिक स्तर गाठला होता.

‘आयबीजेए’ची सुवर्णनाणे विक्री दालने

केवळ सोन्याच्या नाणे विक्री करणारी मुंबईसह निवडक शहरांमध्ये विशेष दालने सुरू करण्यात येणार आहेत. सराफा व्यवसायाचे संघटन असलेल्या ‘इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन’ (आयबीजेए) ने येत्या तीन वर्षांत अशी १०० दालने सुरू करण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी या क्षेत्रातील राजेश वाधवान समूहाबरोबर सहकार्य केले आहे. विविध ५०० आकार, आरेखनातील ५० ग्रॅमपर्यंतचे नाणे या दालनांमध्ये उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती संघटनेचे व्यवसाय प्रमुख (सोने) दीपक तुलसियन यांनी दिली.