News Flash

नोटाबंदीनंतर ६० लाख बँक खात्यांमध्ये प्रत्येकी दोन लाखांहून अधिक ‘कॅश’ जमा

निष्क्रिय खात्यांमध्ये २५ हजार कोटी रुपये जमा

नोटाबंदीनंतर लोकांनी बँकांमध्ये पैसे भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती. (संग्रहित छायाचित्र)

नोटाबंदीचा परिणाम विविध क्षेत्रांत जाणवू लागले असून, त्याची आकडेवारी समोर येऊ लागली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी करवसुलीची आकडेवारी जाहीर केल्यानंतर आज नोटाबंदीनंतर बँक खात्यांमध्ये जमा झालेल्या रोख रकमेची माहिती समोर आली आहे. ६० लाखांहून अधिक बँक खात्यांमध्ये प्रत्येकी दोन लाखांहून अधिक रक्कम जमा करण्यात आली आहे, अशी माहिती उघडकीस आली आहे. नोटाबंदीनंतर तीन ते चार लाख कोटी रुपये अघोषित संपत्ती बँकांमध्ये जमा झाली आहे. आयकर विभाग त्याची चौकशी करत आहे, अशी माहिती एका बँक अधिकाऱ्याने दिली आहे.

नोटाबंदीनंतर लोकांनी कर्जफेडीच्या स्वरुपात ८० हजार कोटी रुपयांची रक्कम जमा केली आहे. तर निष्क्रिय खात्यांमध्ये २५ हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. दरम्यान, सहकारी बँकांमधील विविध खात्यांमध्ये जमा झालेल्या १६ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेची आयकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालय कसून चौकशी करत आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

ईशान्येकडील राज्यांमधील बँकांच्या खात्यांमध्ये ९ नोव्हेंबरनंतर १० हजार ७०० कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. विशेष म्हणजे नोटाबंदीनंतर विविध सरकारी विभागांचे विविध करांच्या स्वरुपातील थकीत रकमेचाही मोठ्या प्रमाणात भरणा केलेला आहे. त्यातही वीज कंपन्यांसाठी नोटाबंदीचा निर्णय अधिक लाभदायक ठरला आहे. लोकांनी मोठ्या प्रमाणात थकीत रक्कम अदा केली आहे. तत्पूर्वी, अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी विविध स्वरुपातील करवसुलीची आकडेवारी जाहीर केली होती. नोटाबंदीनंतर सीमाशुल्क वगळता उर्वरित सर्व प्रकारच्या करवसुलीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 1:31 pm

Web Title: more than rs 2 lakh deposited in over 60 lakh bank accounts post demonetisation
Next Stories
1 अर्थव्यवस्थेवर मंदीछाया नाही
2 संचालक नेमण्याचा अधिकार मिस्त्री कुटुंबीयांना नाही – टाटा
3 ४१,००० पेट्रोल पंपांवर पेटीएम सुविधा
Just Now!
X