बँक खातेदारांवर कर बडगा उगारला जाण्याची चर्चा सुरू असतानाच टाटा ट्रस्टला कर चुकवेगिरीबद्दल नोटीस बजाविण्यात आली आहे. टाटा ट्रस्टमार्फत अद्याप याबाबत काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही.

कर वजावट सवलतींचा गैरवापर करत कर चुकवेगिरी केल्याचा ठपका नियंत्रक व महालेखा परीक्षकांच्या (कॅग) टाटा ट्रस्टवर ठेवला आहे. कॅगच्या २०१३ मधील अहवालावरूनच ही कारवाई करण्यात आल्याचे प्राप्तीकर विभागाने स्पष्ट केले आहे. रतन टाटा यांच्या अध्यक्षतेखालील टाटा ट्रस्टला भक्कम नफा होऊनही सामाजिक दायित्वापोटी कमी खर्च केला गेला, असे म्हटले आहे. अतिरिक्त जमा झालेल्या निधीतून ट्रस्टने अधिक नफ्यासाठी अचल मालमत्ता तयार केल्याचेही नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर कर टाळण्यासाठी सामाजिक दायित्वापोटी खर्च करण्याऐवजी ही रक्कम अन्यत्र वळविल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे.  कॅगने २०१३ मध्ये तयार केलेल्या अहवालात टाटा ट्रस्टसह विविध २२ विश्वस्त संस्थांची अतिरिक्त रक्कम गृहीत धरण्यात आली होती. जमशेटजी टाटा ट्रस्ट व नवजबाई रतन टाटा ट्रस्टला प्राप्तिकर विभागाने गैररित्या कर सूट दिल्याचे अहवालात नमूद आहे. याद्वारे दोन्ही विश्वस्त संस्थांनी ३,१३९ कोटी रुपये प्रतिबंधित अशा माध्यमात गुंतवून भांडवली नफा कमावला; परिणामी १,०६६.९५ कोटी रुपयांचा कर लागू झाला, असेही याबाबतच्या अहवालात म्हटले आहे. दोन्ही विश्वस्त संस्थांनी २०१० मध्ये प्रत्येकी १,९०५ कोटी आणि १,२३४ कोटी रुपये भांडवली नफा कमाविल्याचे कॅगच्या अहवालात स्पष्टपणे मांडण्यात आले आहे.