जवळपास सर्वच क्षेत्रांत महिलांचे प्रमाण वाढत असताना कुटुंबाला प्राधान्य देण्याच्या भूमिकेमुळे त्यांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे, असे पाहणीचा निष्कर्ष आहे. कामकरी महिलांच्या या सर्वेक्षणात भाग घेणाऱ्यांपैकी अवघ्या ३९ टक्के महिलांनी आरोग्य विम्याचे छत्र घेतल्याचेही पुढे आले आहे.

आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीने फेब्रुवारीमध्ये केलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणांतर्गत १,००९ महिलांची मते जाणून घेण्यात आली. महिलांमध्ये आरोग्य चाचणीबाबत उदासीनता असल्याचे आढळून आले.
४० टक्के महिलांना कुटुंबाला प्राधान्य द्यावेसे वाटते. आरोग्य विमा तसेच आरोग्य चाचणीसाठी आग्रही असणाऱ्या महिलांचे प्रमाण कमी असून सर्वेक्षणाला प्रतिसाद देणाऱ्यांपैकी १६ टक्के महिलांनी याबाबत नकारार्थी मत नोंदविले आहे, तर ६३ टक्के महिला केवळ बरे वाटत नसेल तरच आरोग्य चाचणीसाठी पुढाकार घेतात, असे लक्षात आले आहे. गेल्या वर्षभरात दोन वेळा आजारी पडणाऱ्या महिलांचे प्रमाण ७१ टक्के नोंदले गेले आहे, तर ४७ टक्के महिला या गेल्या सहा महिन्यांत दोन वेळा आजारी पडल्या आहेत. सर्वेक्षणात आरोग्य विमा घेणाऱ्या ३९ टक्के महिलांपैकी ५३ टक्के महिला त्यानंतर याबाबत कोणताही विचार करत नाहीत. २२ टक्के महिलांनी स्वत: विमा योजनांची निवड केलेली असते. तर ६३ टक्के महिला या जोडीदाराच्या सल्ल्याने आरोग्य विमा छत्र घेतात, तर १६ टक्के महिलांना त्यांच्या आस्थापनाा ही सुविधा दिली जाते. विमा छत्र घेणाऱ्यांपैकी ४० टक्के महिलांना दावे तसेच लाभाचीही कल्पना नसते, असेही या सर्वेक्षणाने कल नोंदविला आहे. महिलांविषयक विविध आजारांबाबत जाणीव असलेल्यांचे प्रमाण हे ६१ टक्के असले तरी ५९ टक्के महिला या निदानपूर्व चाचण्यांसाठी गेलेल्या नाहीत.