टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हटविण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत सायरस मिस्राी यांनी मंगळवारी नाराजीची प्रतिक्रिया व्यक्त केली. टाटा समूहाविरुद्ध लढताना आपला हेतू स्पष्ट होता आणि न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान आपण योग्य दिशेने जात होतो, असे समर्थनही त्यांनी केले. या वादाची तड लावणारा अंतिम निर्णय झाल्याने आता मला निवांत झोप लागेल, अशी भावनाही मिस्त्री यांनी मंगळवारी व्यक्त केली.

टाटा सन्सच्या अध्यक्षपदावर नियुक्तीचा राष्ट्रीय कंपनी न्यायाधिकरण अपील लवादाचा निर्णय रद्दबातल करताना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी टाटा समूहाच्या बाजूने निकाल दिला. त्यावर मंगळवारी एक पत्रक जारी करत मिस्त्री यांनी, आपली भूमिका स्पष्ट केली. आपल्या कारकिर्दीतील पिढीजात बदलांचा विचार करूनच याबाबतचे पाऊल टाकले होते, असेही ते म्हणाले.

मिस्त्री यांनी म्हटले आहे की, समाजातील प्रत्येक सदस्याने आपल्या कृती आणि श्रद्धेच्या योग्यतेचे प्रमाणीकरण आणि समर्थन करण्यासाठी न्यायालयांसारख्या संस्थांकडे लक्ष दिले आहे. टाटा सन्सचा अल्पसंख्याक भागधारक म्हणून माझ्या खटल्यासंदर्भात दिलेल्या निकालामुळे मी मात्र व्यक्तिश: निराश आहे.

मिस्त्री म्हणाले की, मी यापुढे टाटा समूहाच्या कारभाराच्या दिशेने थेट प्रभाव टाकू शकणार नाही; मात्र मी लढ्यादरम्यान उपस्थित केलेल्या प्रश्नांचे परिणाम संबंधितांवर होऊन नक्कीच बदल घडून येतील. माझ्या आक्षेपाबाबत अंतिम निर्णय आल्याने आता मला शांत झोप लागेल, असेही त्यांनी पत्रात नमूद केले.

सर्वोच्य न्यायालयाचे सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, न्या. ए. एस. बोपन्ना आणि व्ही. रामसुब्रमण्यम यांच्या खंडपीठाने लवादाच्या निर्णयाविरुद्ध टाटा समूहाने दाखल केलेल्या अपिलांनाही शुक्रवारी परवानगी दिली होती. कायद्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे टाटा समूहाच्या अपीलकत्र्यांच्या बाजूने देता येतील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. मिस्राी यांना टाटा समूहाच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्त करण्याच्या अपील लवादाच्या निर्णयाला स्थगिती देऊन सर्वोच्च न्यायालयाने वर्षभरापूर्वी टाटा समूहाला दिलासा दिला होता.

कुटुंब, मित्र, सहकारी माझ्याबरोबर आधी आणि आताही कायम  राहिले हे पाहता मी भाग्यवानच. विधी सल्लागार चमूचे विशेष आभार. मला आणि माझ्या कुटुंबीयांसाठी जीवनाच्या संक्रमणाची ही आणखी एक पायरी आहे.

  • सायरस मिस्री अध्यक्ष, शापूरजी पालनजी समूह