उद्योग आणि पर्यावर यांच्या चर्चेत राहिलेला देशातील रंग व रसायन उद्योग ग्राहकहिताबरोबरच सामाजिक जबाबदारीचे भान राखून असल्याचा दावा कन्साई नेरोलॅक पेंटसचे व्यवस्थापकीय संचालक एच. एम. भारुका करतात. या क्षेत्राच्या दुहेरी आकडय़ातील वाढीबाबत त्यांच्याच शब्दात

* रंग व रसायन उद्योगाच्या सद्यस्थितीबाबत काय सांगाल?
रंग व रसायन उद्योगाने मागील २५ वर्षांत दुहेरी आकडय़ातील वाढीचे सातत्य राखले आहे. भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थेत पुढील २५ वष्रेदेखील रंग व रसायन उद्योग याच वेगाने वाढत राहिल. आमचा व्यवसाय गृहनिर्माण, पायाभूत सुविधा भांडवली वस्तू, वाहन उद्योग अशा वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रांशी संबंधित असल्याने आम्ही एखाद्या उद्योग क्षेत्रातील मंदीचा आमच्या व्यवसायावर फारच कमी परिणाम होतो. गुंतवणूकदारांनी आमच्या कंपनीच्या व्यवसाय करण्याच्या पद्धतीवर विश्वास ठेऊन आमच्या समभागात गुंतवणूक केली आहे.
* तुमच्या व्यवसायावर सरकारी धोरणे पोषक आहेत असे वाटते काय?
नक्कीच सध्याची सरकारची धोरणे रंग उद्योगाच्या वाढीसाठी पोषक आहेत असेच म्हणावे लागेल. सरकारचे धोरण पायाभूत सुविधा विकसित करण्याचे असल्याने याचा फायदा रंग उद्योगास नक्कीच होत आहे. भारताची लोकसंख्या आमच्या उद्योगाच्या वाढीसाठी सकारात्मक आहे. सरकारचे २०२२ पर्यंत सर्वाना निवारा उपलब्ध करून देण्याचे असल्याने याचा अप्रत्यक्ष फायदा आम्हाला नक्कीच होईल.
* परंतु ग्रामीण भागात तुम्हाला असंघटीत रंग उत्पादकांशी मोठय़ा प्रमाणावर स्पर्धा करावी लागते. त्याचे काय?
या बाबत माझे म्हणणे नेहमीच आमच्या उद्योग मंचावर मी मांडत आलो आहे. रंग उद्योगात ३५% वाटा हा असंघटीत क्षेत्राचा आहे. पुरवठा साखळीच्या शेवटच्या स्तरापर्यंत संघटीत उत्पादक पोचू शकत नाही. अजूनही भारतात अनेक घरांच्या भिंती शेणाने सारवलेल्या आढळतात. या ग्राहकांच्या गरजा शहरातील ग्राहकांच्या गरजाहून निराळ्या असतात. उदारणार्थ या ग्राहकांना १/२ किलो किंवा कमी वजनाचे डबे लागतात जे असंघटीत क्षेत्राकडून पुरविले जातात. ग्राहकांच्या या गटाला शेणापासून रंगापर्यंत नेण्याचे काम असंघटीत क्षेत्रातील उत्पादक स्थानिक पातळीवर करीत असतात. तेव्हा असंघटीत क्षेत्रातील उत्पादक आमचे स्पर्धक आहेत असे मानणे योग्य नव्हे.
* रंग व विशेष रसायने उद्योग पर्यावरणाला धोकादायक आहे, असा काही मंडळींचा आक्षेप आहे. यावर आपले म्हणणे काय?
रंग व विशेष रसायने उद्योग हा वातावरण प्रदुषित करतो हे अर्धसत्य आहे. आम्ही अशी उत्पादने व उत्पादने तयार करण्याच्या पद्धती विकसित केली असून आमची कंपनी पर्यावरणाची विशेष काळजी घेते. आम्ही वाहन व यंत्र सामुग्री उद्योगासाठी अशी काही उत्पादने विकसित केली आहेत जी आमच्या केवळ ग्राहकांचे हित लक्षात घेतात असे नव्हे तर पर्यावराणाचे रक्षणही करतात. आम्ही ज्या पाण्याचा विसर्ग करतो त्या पाण्याच्या दर्जा समाधान कारक असल्याने वातावरणाची हानी करीत नाही. महाराष्ट्रातील चिपळूण लोटे येथील कारखान्यातून विसर्ग होणाऱ्या पाण्याचा दर्जा समाधानकारक असल्याची सरकार दरबारी विशेष नोंद घेण्यात आली असून इतर उद्योगांसमोर आम्ही आदर्श निर्माण केला आहे. इतकेच नव्हे तर आम्ही काही उत्पादने पर्यावरणस्न्ोही असून त्याचा फायदा पर्यावरणाच्या बरोबरीने ग्राहकांनादेखील होतो. घराला लावायचे रंग हे कमी वायू उत्सर्जति करणारे असल्याचा फायदा पर्यावरणासोबत थेट ग्राहकांनासुद्धा होतो.
* कच्या तेलाच्या किंमती कमी झाल्याने तुमच्या कच्च्या मालाच्या किंमतीत मोठी घट झाली आहे. हे तुम्ही मागील आठवडय़ात जाहीर केलेल्या वार्षकि निकालात दिसून आले आहे. याचा फायदा तुम्ही तुमच्या ग्राहकांपर्यंत पोचविणार काय?
कच्च्या तेलाच्या किंमतीत कपात झाल्याने आमचा उत्पादन खर्च सरासरी १३ रुपये कमी झाला आहे. आम्ही आमच्या उत्पादन खर्चात झालेल्या बचतीचा लाभ आमच्या ग्राहकापर्यत नक्कीच पोहचविला आहे. आम्ही या आधी तीन वेळा आमच्या उत्पादनांच्या किमतीत कपात केली असून भविष्यात जर किंमती कमी झाल्या तर आम्ही किंमतीत यापुढेही कपात करीत राहू.
* येत्या वर्ष दोन वर्षांतील कंपनीच्या कामगिरीबाबत तुमच्या काय योजना आहेत?
या वर्षी सरासरीहून अधिक पाऊस अपेक्षित आहे.सततच्या दोन वर्षांच्या अपुऱ्या पावसानंतर ही बातमी नक्कीच आनंद देणारी आहे. आजही देशातील बहुसंख्य जनता ही शेतीवर अवलंबून आहे. उत्तम पावसामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणे अपेक्षित आहे. एक रंग उत्पादक म्हणून ग्रामीण अर्थव्यवस्थेची क्रयशक्ती वाढणे हे आमच्यासाठी नक्कीच फायाद्यचे ठरेल २०१६-१७ च्या निकालातून याचा प्रत्यय आमच्या कंपनीशी सर्व संबिंधतांना दिसून येईल. येत्या दोन वर्षांचा विचार करायचे ठरल्यासआमची कामगिरी गुंतवणूकदारांच्या अपेक्षेला साजेशी असेल, असे म्हणावयास हरकत नाही.