प्रधान मंत्री सूक्ष्म गट विकास पुनर्वित्त संस्था (मुद्रा) योजनेंतर्गत कर्ज वितरणासाठी कर्ज हमी निधी स्थापन करण्यासह मुद्रा कंपनीचे बँकेत परिवर्तन करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुद्राअंतर्गत कर्ज वितरणासाठी कर्ज हमी निधी स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली. सूक्ष्म व लघु उद्योगांकरिता एक लाख कोटी रुपयांपर्यंत कर्ज वितरित करण्यासाठी कर्ज हमी निधी कार्यरत होईल. त्याचबरोबर मुद्रा लिमिटेड या बिगरबँकिंग वित्त कंपनीचे मुद्रा बँक (मुद्रा सिडबी) करण्यासही मंजुरी देण्यात आली. ही बँक आता सिडबीची (स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया) उपशाखा म्हणून कार्य करेल. मुद्रा योजनेंतर्गत सध्या शिशू, किशोर व तरुण या ५० हजार ते १० लाख रुपयांपर्यंतच्या भिन्न कर्ज मर्यादेच्या तीन योजना अस्तित्वात आहेत. सिडबीची उपकंपनी म्हणून मुद्रा लिमिटेड मार्च २०१५ अस्तित्वात आल्यानंतर पुढील महिन्यातच मुद्रा योजना सुरू करण्यात आली.