रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मुकेश अंबानी यांचे प्रतिपादन

जलद दूरसंचार सेवा क्षेत्राचे गेल्या वर्षभरात २जीवरून थेट ४जीपर्यंत संक्रमण झाले असून डेटा हे आजच्या युगात डिजिटल अर्थव्यवस्थेचा श्वास बनले आहे, असे प्रतिपादन रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी बुधवारी येथे केले.

दूरसंचार क्षेत्राचा ऊहापोह करणाऱ्या परिषदेला ते संबोधित करत होते. यावेळी क्षेत्रातील अनेक आघाडीचे उद्योजक तसेच दूरसंचार सेवा क्षेत्राशी संबंधित विभागातील सरकारी अधिकारी उपस्थित होते. डेटा हे डिजिटल अर्थव्यवस्थेचा श्वास असून परवडणाऱ्या दरात उच्च वेगक्षमता असलेला डेटा पुरविणे दूरसंचार क्षेत्रातील सेवा पुरवठादारांचे कर्तव्य आहे, असेही ते म्हणाले. प्रत्येक भारतीयाला परवडणाऱ्या दरातील स्मार्टफोन, इंटरनेट आदी मिळायलाच हवे, यावर त्यांनी यावेळी भर दिला.

मोबाइल इंटरनेट बाजारपेठही वेगाने विस्तारत असून येत्या वर्षभरात २जी ते ४जी असे संपूर्ण परिवर्तन झालेले आपल्याला दिसेल, असा विश्वास अंबानी यांनी यावेळी व्यक्त केला. डिजिटल पायाभूत सेवा उभारणीसाठी भारतातील दूरसंचार क्षेत्र तसेच माहिती तंत्रज्ञान उद्योगाचेही योगदान असल्याचे अंबानी यावेळी म्हणाले. हे तंत्रज्ञान चौथ्या औद्योगिक क्रांतीचा पाया आहे, असेही त्यांनी सांगितले. रिलायन्सच्या जिओचे गेल्या वर्षभरात १२.८ कोटी ग्राहक झाले असून कंपनी येत्या आठवडय़ात तिची ४जी सेवा उपलब्ध करून देणार आहे. यासाठी कंपनीच्या ग्राहकांना १,५०० रुपयांना फोन मिळणार आहे.

अर्थव्यवस्था ७ लाख कोटी डॉलरची होणार

भारतीय अर्थव्यवस्थेबाबत आशादायक प्रवास वर्णन करताना अंबानी यांनी सांगितले की, देशाची अर्थव्यवस्था सध्याच्या २.५ लाख कोटी डॉलरवरून येत्या १० वर्षांत ७ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल. जगातील अव्वल तीन अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा क्रमांक  असेल, असेही ते म्हणाले.

डेटा हे (विकासाचे) नवे इंधन आहे. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी लाखो भारतीयांकरिता ते एक संधी निर्माण करते आहे. भारताला ते आयात करण्याची गरज नाही. ते ऊर्जा, पाणी आणि निसर्गसंपदा आदी  देशाचे प्राधान्यक्रम गाठण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान उपयोगी ठरू शकते.  – मुकेश अंबानी, अध्यक्ष, रिलायन्स इंडस्ट्रीज.