27 February 2021

News Flash

सलग अकराव्या वर्षी मुकेश अंबानी सर्वात श्रीमंत भारतीय

फोर्ब्स मॅगेझिनच्या श्रीमंताच्या यादीत अग्रस्थानी असलेल्या अंबानी यांची संपत्ती 47.3 अब्ज डॉलर्स आहे

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सर्वात श्रीमंत भारतीय हे बिरूद सलग अकराव्या वर्षी कायम राखले आहे. फोर्ब्स मॅगेझिनच्या श्रीमंताच्या यादीत अग्रस्थानी असलेल्या अंबानी यांची संपत्ती 47.3 अब्ज डॉलर्स आहे. या वर्षी संपत्तीत सगळ्यात जास्त भर पडणाऱ्यांमध्येही अंबानी यांचा समावेश असून त्यांच्या संपत्तीत एका वर्षात 9.3 अब्ज डॉलर्सची भर पडली आहे. रिलायन्स जिओनं अंबानींच्या श्रीमंतीला हातभार लावल्याचे दिसत आहे.

‘फोर्ब्स इंडिया रिच लिस्ट 2018’ मध्ये विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी 21 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहेत. तर 18.3 अब्ज डॉलर्ससह आर्सेलरमित्तलचे अध्यक्ष व सीईओ लक्ष्मी मित्तल तिसऱ्या स्थानी आहेत. प्रेमजी यांच्या संपत्तीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दोन अब्ज डॉलर्सची तर मित्तल यांच्या संपत्तीत 1.8 अब्ज डॉलर्सची भर पडली आहे. सर्वात श्रीमंत अशा पहिल्या 10 जणांमध्ये शिव नाडर (14.6 अब्ज डॉलर्स), गोदरेज कुटुंब (14 अब्ज डॉलर्स), दिलीप संघवी (12.6 अब्ज डॉलर्स), कुमार बिर्ला (12.5 अब्ज डॉलर्स) व गौतम अदाणी (11.9 अब्ज डॉलर्स) या उद्योजकांचा समावेश आहे.

जरी अतिश्रीमंतांनी त्यांची संपत्ती व स्थान अबाधित राखलं असलं तरी नवीन अब्जाधीश तयार होत असून भारतीय उद्योजकांची आंत्रप्रिनर बनण्याची क्षमता वाढत असल्याचे यंदाही दिसून आल्याचे फोर्ब्सच्या इंडिया एडिटर नाझनीन करमाली यांनी म्हटलं आहे. टक्केवारीमध्ये सगळ्यात जास्त संपत्ती कुणाची वाढली हा निकष लावला तर बायोटेक्नॉलॉजीमधल्या अग्रणी किरण मजुमदार शॉ अग्रस्थानी असून त्यांची संपत्ती गेल्या वर्षीच्या तुलनेत 66.7 टक्क्यांनी वाढून 3.6 अब्ज डॉलर्स झाली आहे. श्रीमंतांच्या यादीतील त्यांचं स्थान 39 वर आहे.

विशेष म्हणजे रुपयाच्या ऐतिहासिक घसरणीमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत शेअर बाजाराची भरारी 14 टक्क्यांनी उतरंडीला लागलेली असताना फोर्ब्सच्या यादीतील श्रीमंतांची संपत्ती मात्र किंचित वाढून 495 अब्ज डॉलर्स झाली आहे. या यादीमध्ये पाच नवीन अब्जाधीशांचा समावेश झाला असून ही देखील भारतीय उद्योगजगतासाठी चांगली बाब मानली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2018 11:37 am

Web Title: mukesh ambani richest indian for eleven consecutive year
Next Stories
1 सेन्सेक्सची 800 अंकांची पडझड, रुपयाही घरंगळला
2 ढासळता रुपया, खनिज तेलातील उसळीच्या धसक्याने अगतिक पडझड!
3 महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियमात सुधारणा
Just Now!
X