अतिजलद इंटरनेट सेवेसाठीच्या ४जी तंत्रज्ञानासाठी अंबानी बंधूंमध्ये वर्षांतील तिसरा सहकार्य करार पार पडला आहे. मुकेश अंबानी प्रवर्तित रिलायन्स जीओने धाकटे बंधू अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सबरोबर आंतरशहर फायबर केबलचे जाळे उपयोगात आणण्यासाठी करार केला आहे.
रिलायन्स कम्युनिकेशन्सद्वारे जमिनीखाली असणाऱ्या ऑप्टिक फायबर नेटवर्कसाठी यंत्रणा उभारली गेली आहे. त्यावर अतिजलद अशी ४जी मोबाइल तंत्रज्ञान सेवा पुरविता येईल. देशातील ३०० शहरांमध्ये ऑप्टिक फायबर नेटवर्क असणाऱ्या रिलायन्स कम्युनिकेशन्सला तिचा वापर रिलायन्स जीओला करू देण्याच्या निमित्ताने ५,००० कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे.
रिलायन्स जीओ ही या सेवेचा देशव्यापी परवाना मिळविणारी एकमेव कंपनी आहे. याअंतर्गत अंबांनी बंधूंनी एप्रिल २०१३ मध्ये दूरसंचार सहकार्यासाठी १,२०० कोटी रुपयांचा करार केला. यानंतर ऑगस्ट २०१३ मध्ये दूरसंचार मनोऱ्यासाठी उभयतांमध्ये सहकार्य घेण्यात आले.