गृहनिर्माण क्षेत्रातील मंदीचा फटका देशातील आर्थिक राजधानीतील नव्या घरांना बसला असून मुंबई परिसरातील १.९५ लाख नवीन घरे विक्रीविना आहेत. गेल्या सहा महिन्यांत नव्या घरांची निर्मितीही ४० टक्क्यांनी घसरली आहे.
निवाऱ्याला असलेल्या कमी मागणीमध्ये देशातील प्रमुख शहरांमध्ये मुंबईचा क्रम वरचा आहे. राजकीय राजधानी दिल्लीत जानेवारी ते जून २०१५ दरम्यान नवीन १.९० घरांची विक्री अद्याप झालेली नाही. तर मुंबई महानगर प्राधिकरण विभागांतर्गत न विकले गेलेल्या घरांची संख्या १.९५ लाख आहे.
शहरातील नव्या घरांची निर्मितीही चालू वर्षांच्या पहिल्या सहा महिन्यांत ४० टक्क्यांनी रोडावत ९५,४०० घरांवर आली आहे. जानेवारी ते जून २०१४ दरम्यान नव्या घर निर्मितीची संख्या तब्बल १.६० लाख होती.
मुंबईबरोबरच देशातील प्रमुख बडय़ा आठ शहरांमधील ७ लाख घरे विक्रीअभावी असून राष्ट्रीय पातळीवर घरांची विक्रीही १९ टक्क्यांनी कमी झाली आहे. सहा महिन्यांत १.१० घरांची विक्री प्रमुख आठ शहरांमध्ये झाली आहे. ती संख्या यापूर्वी १.३६ लाख होती. गृहनिर्माण क्षेत्रातील चित्र असेच राहिल्यास न विकले गेलेल्या घरांना ग्राहक मिळण्यास आणखी तीन वर्षे लागण्याची भीती ‘नाइट फ्रॅन्क’ने तिच्या ताज्या अहवालात व्यक्त केली आहे.
घरखरेदीबाबत आगामी कालावधीतही मुंबई परिसरातील ग्राहकांचा थंडा प्रतिसाद राहण्याची भीती ‘नाइट फ्रॅन्क’चे मुख्य अर्थतज्ज्ञ संतक दास यांनी व्यक्त केली.