मुंबई निर्देशांकात सातव्या व्यवहारात वाढ; निफ्टी १२ हजाराच्या उंबरठय़ावर

सलग सातव्या व्यवहारात निर्देशांक तेजी नोंदविताना मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सप्ताहारंभीच नव्या विक्रमी टप्प्यावर झेपावला. जागतिक भांडवली बाजाराची साथ असतानाच येथील माहिती तंत्रज्ञान, पोलाद, वित्त क्षेत्रातील समभागांकरिता गुंतवणूकदारांनी खरेदीपसंती नोंदिवल्याने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सोमवारी अर्धशतकी निर्देशांकवाढीने १२ हजारानजीक पोहोचला.

कंपन्यांच्या दुसऱ्या तिमाही वित्तीय निष्कर्षांचे स्वागत करण्याचे गुंतवणूकदारांचे गेल्या आठवडय़ापासूनचे धोरण नव्या सप्ताहारंभीही कायम राहिले. त्यातच प्रामुख्याने आशियाई बाजारातील प्रमुख निर्देशांक वाढीने साथ दिल्याने येथील सेन्सेक्स व निफ्टीत मोठी भर पडली. परिणामी मुंबई निर्देशांक तर प्रथमच ४०,५०० पर्यंत झेपावला.

सोमवारी सेन्सेक्समध्ये १३६.९३ अंश भर पडत निर्देशांक ४०,३०१.९६ वर पोहोचला. तर निफ्टी ५०.७० अंश वाढीसह ११,९४१.३० पर्यंत स्थिरावला. सेन्सेक्सचा सप्ताहारंभीच्या व्यवहारातील ४०,४८३.२१ टप्पाही ऐतिहासिक ठरला. भांडवली बाजारात सलग सात व्यवहारांपासून तेजीचे वातावरण आहे.

सोमवारी सेन्सेक्स या मुंबई शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांकातील इन्फोसिस, वेदांता, टाटा स्टील, ओएनजीसी, आयसीआयसीआय बँक आदी ३ टक्क्य़ांपर्यंत वाढले. दुसऱ्या तिमाहीत तब्बल ७६ टक्के नफावाढ नोंदविणाऱ्या एचडीएफसी लिमिटेडचे समभागमूल्य जवळपास २.५० टक्क्य़ांनी वाढले. तर मारुती सुझुकी, हीरो मोटोकॉर्प, टाटा मोटर्स, पॉवरग्रिड आदी मात्र त्याच प्रमाणात घसरले.

व्यापार युद्धाच्या चर्चेत प्रमुख असलेल्या अमेरिका-चीन दरम्यानचा तणाव निवळण्याबाबतची आशा आशियाई भांडवली बाजारतही पहायला मिळाली. सिंगापूर, चीनमधील प्रमुख निर्देशांक एक टक्क्य़ाहून अधिक प्रमाणात वाढले.

गेल्या आठवडय़ात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने १,१०६.९७ आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने ३०६.७० अंश सप्ताह वाढ नोंदविली होती.

सेन्सेक्सने मार्च २०१९ च्या मध्यानंतर यंदा प्रथमच सलग सात व्यवहारातील निर्देशांक तेजी नोंदविली आहे. तर मुंबई निर्देशांकाने यापूर्वी ३ जून रोजी ४०,२६७.६२ असा सर्वोच्च टप्पा गाठला होता.

भांडवली बाजारातील विदेशी गुंतवणूकदार, संस्थांकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने खरेदीचे धोरण अवलंबिले जात आहे.

रुपयाचा सव्वा महिन्याचा उच्चांक

डॉलरच्या तुलनेत रुपया पाच आठवडय़ांच्या वरच्या टप्प्यावर पोहोचला आहे. स्थानिक चलन सप्ताहारंभी ४ पैशांनी उंचावत ७०,७७ वर स्थिरावले.