देशभरात ऑनलाइन खरेदीच्सा प्रमाणात वर्षभरात सुमारे ५० टक्के वाढ झाली आहे. ऑनलाइन खरेदी करण्यात दिल्लीकर आघाडीवर असून बंगळूर व तिसऱ्या स्थानावर मुंबई या शहरांमधून सर्वाधिक ऑनलाइन खरेदी होत असल्याचे स्नॅपडीलने प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत सर्वाधिक ऑनलाइन खरेदीमध्ये दिल्ली, बंगळूर व मुंबई या प्रमुख शहरांनंतर प्रथम श्रेणीच्या शहरांमध्ये पुणे शहर आघाडीवर आहे. वर्षभरात देशात झालेल्या ऑनलाइन खरेदीतील ६० टक्के मागणी ही द्वितीय श्रेणीच्या शहरांमधून होत असून ४० टक्के मागणी महानगरे व प्रथम श्रेणीच्या शहरांमधून झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मोबाइलवरुन खरेदी करणाऱ्यांचे प्रमाणा वाढत असून या वर्षभरात मोबाइल अ‍ॅपच्या वापरात ८२ टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली आहे. ऑनलाइन व्यवहारांमध्ये सातत्याने वाढ होत असून जास्तीत जास्त शहरांपर्यंत सामान पोहचवण्याची क्षमता वाढल्यामुळे ग्रामीण भागातून तसेच निम शहरांमधूनही मागणी वाढत असल्याचे स्नॅपडीलचे वरिष्ठ उपाध्यक्ष विशाल चढ्ढा यांनी नमूद केले.

महानगरांमध्ये पुरुषांच्या सौंदर्य प्रसाधन उत्पादनांच्या मागणीत ५८ टक्क्यांनी वाढणली आहे. तर महिलांच्या सौंदर्य प्रसाधन उत्पादनांच्या मागणीत तब्बल ३४५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या खालोखार मोबाइल आणि टॅबलेटच्या मागणीत वाढ झाली आहे. मोबाइल आणि टॅबलेटच्या विक्री पैकी ३५ टक्के विक्री ही उत्तर भारतात झाली.

तर महिलांच्या पारंपरिक पोषाखाची मागणीही वाढली असून या विभागातील विक्रीपैकी २४ टक्के विक्री पूर्व भारतात झाली आहे.