केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शुक्रवारी शेअर बाजारातील घसरण सुरुच आहे. सकाळी ३०० अंशांनी घसरलेला सेन्सेक्स दुपारपर्यंत ८०० अंशांनी खाली आला. तर निफ्टीत देखील घसरण झाली. निफ्टी २५० अंशांनी खाली आला.

गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१८-१९ साठीचा अर्थसंकल्प सादर करताना भांडवली बाजारातील व्यवहारातून १ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेवर होणाऱ्या लाभावर १० टक्के कर प्रस्तावित करण्याची घोषणा केली होती. तसेच आगामी वित्त वर्षांतील सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या प्रमाणातील वाढत्या वित्तीय तुटीच्या लक्ष्यावरही नकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. पुढील आर्थिक वर्ष म्हणजेच २०१८ – १९ मध्ये वित्तीय तुट ३.३ टक्के इतकी राहील, असे जेटलींनी सांगितले. यापूर्वी २०१८ – १९ वित्तीय तुट ३.२ टक्के इतकी राहील असा अंदाज होता. या शिवाय सिंगापूर व आशियातील अन्य शेअर मार्केटमध्ये झालेली घसरण, याचा परिणाम शुक्रवारी शेअर बाजारावर दिसून आला.

शुक्रवारी शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स जवळपास ३०० अंशांनी घसरला. तर निफ्टीतही घसरण बघायली मिळाली. अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, एल अँड टी, कोटक महिंद्रा आदींच्या शेअरच्या दरात घसरण झाली.  रिझर्व्ह बँक पुढील आठवड्यात पतधोरण जाहीर करणार आहे. तसेच बजेटमधील घोषणांबाबत काहीसा संभ्रम असल्याने शेअर बाजारात घसरण झाल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला. दुपारी सेन्सेक्स तब्बल ८०० अंशांनी गडगडला तर निफ्टीही २५० अंशांपर्यंत खाली घसरला.