येस बँकेवरील संकट, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्चा तेलाच्या दरातील घसरण आणि करोना व्हायरस या तिहेरी संकटाचा फटका शेअर बाजाराला बसला आहे. सोमवारी दिवसभराच्या व्यवहारात मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात तब्बल १९०० पेक्षा जास्त अंकांची घसरण झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सुद्धा ५०० पेक्षा जास्त अंकांनी गडगडला.

करोना व्हायरसमुळे आधीच शेअर बाजारात निरुत्साह असताना, येस बँकेवर आरबीआयने निर्बंध लादले त्यामुळे शुक्रवारी बाजार आणखी गडगडला. आता सौदी अरेबियाने तेल बाजारपेठेला मोठा धक्का दिला आहे. एकेकाळचा सहकारी असलेल्या रशिया विरोधात सौदी अरेबियाने दर युद्ध सुरु केले आहे. त्यामुळे तेलाच्या किंमतीमध्ये ऐतिहासिक घसरण झाली आहे.

दिवसभराच्या व्यवहारात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३६ हजारांच्या खाली आला व ३५६३४ अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १०,४५१ वर बंद झाला. मागच्या आठवडयात सप्ताहाच्या शेवटी शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३८ हजाराचा स्तर सोडत ३७,५७६.६२ वर येऊन ठेपला. तर २७९.५५ अंश घसरणीने ११ हजाराचा टप्पा सोडताना राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १०,९८९.४५ पर्यंत स्थिरावला होता. निर्देशांकाच्या सततच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे काही लाख कोटींचे नुकसान झाले आहे.