प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला म्युच्युअल फंड दिवस साजरा करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या फंड उद्योग परिषदेत झाला. आघाडीच्या फंड उद्योगांचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले होते.

म्युच्युअल फंडांची गुंतवणूक खाती  (फोलियो) वाढत आहेत, मात्र प्रत्यक्ष गुंतवणूकदारांची संख्या त्या प्रमाणात वाढत नाही, अशी खंत या वेळी व्यक्त करण्यात आली.

प्रत्यक्षात गुंतवणूकदारांच्या वाढीचे प्रमाण अवघे एक ते दोन टक्के असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. मुदत ठेवीसारख्या पारंपरिक गुंतवणूक पर्यायाकडे अद्यापही गुंतवणूकदारांचा ओढा कायम असल्याने फंडांकडे गुंतवणूकदार वळण्याचे प्रमाण कमी असल्याचा निष्कर्ष या वेळी काढण्यात आला.

म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा कल आता इक्विटीकडून डेट, बॅलेंस्ड असा बदलला असून डिसेंबर २०१७ अखेर फंडातील एकूण मालमत्ता २० लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडेल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला. विविध फंड कंपन्यांच्या हजारो योजनांमधील मालमत्ता सध्या १७ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

जागतिक स्तरावरील ब्रेग्झिट, ट्रम्प निवडसारख्या जागतिक अस्थिरतेच्या कालावधीतही फंडांमध्ये अनुक्रमे ५,००० व १२,००० कोटी रुपयांचा निधी आल्याकडेही या वेळी लक्ष वेधण्यात आले.

फंडासाठीच्या नियामक यंत्रणेचे कोणीही प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित नव्हते, मात्र यूटीआय, रेलिगेयर आदी फंड कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी, निधी व्यवस्थापकांनी या वेळी हजेरी लावली.