नोव्हेंबरअखेर खातेसंख्या ८.६५ कोटींवर

देशातील म्युच्युअल फंड खातेधारकांच्या संख्येत सरलेल्या नोव्हेंबरमध्ये २.६० लाखांची भर पडली असून, परिणामी महिनाअखेर त्यांची एकूण संख्या ८.६५ कोटींवर पोहोचली आहे.

भांडवली बाजारातील जोखमेच्या तुलनेत म्युच्युअल फंड पर्याय गुंतवणूकदारांनी स्वीकारल्याचे निरीक्षण यानिमित्ताने ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (अ‍ॅम्फी)’ने नोंदविले आहे. देशातील ४४ फंड घराण्याचे नेतृत्व ही संघटना करते.

ऑक्टोबरअखेरच्या ८,६२,५६,८८० वरून म्युच्युअल फंड खात्यांची (फोलियो) संख्या २,६१,७०५ ने वाढून नोव्हेंबरअखेर ८,६५,१८,५८५ पर्यंत पोहोचली आहे. आधीच्या ऑक्टोबरमध्ये ६ लाखांची, सप्टेंबरमध्ये ३.४ लाखांची तर ऑगस्ट व जुलैमध्ये अनुक्रमे ४.८ लाख व १० लाख फोलियोंची नव्याने भर पडली आहे.

भांडवली बाजाराच्या तुलनेत फंडातील गुंतवणुकीत जोखीम कमी असल्याचे ताज्या आकडेवारीवरून दिसत असले तरी ऑक्टोबरच्या तुलनेत गेल्या महिन्यातील वाढलेल्या फोलियोंची संख्या कमी असल्याचेही स्पष्ट होत आहे. म्युच्युअल फंडांच्या समभाग आणि समभाग संलग्न योजनांमधील खातेसंख्या नोव्हेंबरअखेर १.२० लाखांनी वाढून ६.२१ कोटींपर्यंत गेली आहे. आधीच्या महिन्यातील ३ लाखांच्या वाढीच्या तुलनेत यंदाची वाढ ही निम्म्याहूनही कमी आहे.

म्युच्युअल फंडांच्या रोखे संलग्न योजनांच्या खात्यांची संख्या ५.४० लाखांनी वाढून ७०.१२ लाखांपर्यंत वाढली आहे. या गटात लिक्विड फंडांचा क्रम १७.४५ लाखांसह अव्वल स्थानी आहे.

देशातील म्युच्युअल फंडमधील मालमत्ता नोव्हेंबरमध्ये सर्वोच्च अशा २७.०४ लाख कोटी रुपयांवर पोहोचल्याची आकडेवारी देशातील फंड संघटनेने सोमवारीच जाहीर केली. गेल्या महिन्यात म्युच्युअल फंडांमध्ये ५४,४१९ कोटी रुपयांची भर पडली.