म्युच्युअल फंडांतील एकूण गुंतवणूक (गंगाजळी) सरलेल्या ऑक्टोबरअखेर २६.३३ लाख कोटी रुपयांवर गेली आहे. सप्टेंबरअखेरच्या पातळीवरून त्यात ७.४ टक्क्य़ांची वाढ दिसली आहे. या महिन्यांत समभाग गुंतवणूक करणाऱ्या (इक्विटी) फंडातील गुंतवणुकीला मात्र ओहोटी लागल्याचे देशातील ४४ म्युच्युअल फंडांची शिखर संघटना असलेल्या ‘अ‍ॅम्फी’च्या शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या मासिक आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे.

सरलेल्या महिन्यांत म्युच्युअल फंडांनी एकूण १.३३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक नव्याने मिळविली, त्यात केवळ लिक्विड फंडांतील गुंतवणूक ओघ हा ९३,२०० कोटी रुपयांचा आहे. आधीच्या सप्टेंबरमध्ये म्युच्युअल फंडांतून गुंतवणूकदारांनी १.५२ लाख कोटी रुपये काढून घेतले होते.

सप्टेंबर महिन्यातील ६,६०९ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये ६,०२६ कोटींची गुंतवणूक इक्विटी फंडात झाली आहे. ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक निर्गुतवणूक ‘व्हॅल्यू’ वर्गवारीतील फंडात झाली आहे. या प्रकारच्या फंडातून २२८.७४ कोटी रुपये गुंतवणूकदारांनी काढून घेतली. तथापि, इक्विटी फंडातील सप्टेंबर महिन्यातील दैनिक सरासरी व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) ७,०१,८७९.७० कोटींवरून ऑक्टोबर २०१८ मध्ये ७,२५,१०७.१२ कोटी रुपये होती.

सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक १,५५९.५३ कोटी रुपये गुंतवणूक लार्ज कॅप फंड प्रकारात झाली होती. सरलेल्या ऑक्टोबर महिन्यात या मालमत्तेत घट होऊन लार्ज कॅप फंड गटात १,१८२ कोटी रुपये गुंतवणूक झाली. लार्ज कॅप फंड प्रकारातील दैनिक सरासरी व्यवस्थापनाखालील मालमत्ता सप्टेंबर महिन्यातील १,४४,२७२.९१ कोटींवरून १,४९,९३९.३४ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

बाजारातील अस्थिरतेची सर्वाधिक झळ मिड कॅप फंड प्रकाराला पोहोचली असून सप्टेंबर महिन्यात मिड कॅप फंडात झालेल्या १,२७६.६६ कोटी रुपयांच्या नवीन गुंतवणुकीच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात केवळ १,०९१.०४ कोटी रुपये नव्याने गुंतविले गेले. परंतु मिड कॅप फंड प्रकारातील दैनिक सरासरी व्यवस्थापनाखालील मालमत्ता सप्टेंबरच्या तुलनेत ७८,६७२ कोटींवरून ती ऑक्टोबरमध्ये ८२,१३८ कोटी रुपयांवर पोहोचली. स्मॉल कॅप फंड प्रकारातही मासिक आवक कमी झाली असून सप्टेंबरमधील ८९५ कोटी रुपयांच्या तुलनेत ऑक्टबरमध्ये मासिक आवक ६७८ कोटी रुपये होती. स्मॉल कॅप प्रकारात सप्टेंबरमधील व्यवस्थापनाखालील दैनिक सरासरी मालमत्ता ४६,१५३ कोटी रुपयांवरून ऑक्टोबरमध्ये व्यवस्थापनाखालील दैनिक सरासरी मालमत्ता ४७,८४३ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

‘‘म्युच्युअल फंडाच्या मालमत्तेत प्रथमच नियोजनबद्ध गुंतवणुकीतून (एसआयपी) आलेल्या मालमत्तेने प्रथमच तीन लाख कोटींचा टप्पा पार केला असून त्यात सतत वाढ होताना दिसत आहे. किरकोळ गुंतवणूकदारांनी स्वीकारलेल्या शिस्तबद्ध दृष्टिकोनाचे हे सकारात्मक प्रतिबिंब आहे. सरकारकडून होत असलेल्या सकारात्मक सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेला गती प्राप्त होऊन नजीकच्या काळात याचे प्रतिबिंब भांडवली बाजारात उमटलेले दिसेल. परिणामी, समभाग गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडाच्या मालमत्तेत वाढ होण्याबाबत आम्हाला आशा वाटते,’’ असे प्रतिपादन ‘अ‍ॅम्फी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एन. वेंकटेशन यांनी याप्रसंगी केले.