भांडवली बाजारात निर्देशांकांनी, सलगपणे तेजीची दौड कायम राखत सामान्य गुंतवणूकदारांना सुगावा लागण्याच्या आत सार्वकालिक उच्चांकाला झेपही घेतली आहे. अशा तेजीत सहभागाची संधी हुकली असे वाटणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंडातील ‘अ‍ॅसेट अलोकेशन फंड’ हा प्रकार एक सुरक्षित पर्याय ठरत आहे.

मागील तीन, पाच आणि १० वर्षे या भांडवली बाजारासाठी प्रचंड चढ-उताराच्या राहिलेल्या काळात, म्युच्युअल फंडाच्या या प्रकारातील अनेक योजनांनी निर्देशांकापेक्षाही सरस परतावा दिला आहे. देशातील अग्रणी फंड घराण्याच्या आयसीआयसीआय प्रुडेन्शियलची कामगिरी ही सर्वोत्तम राहिली असून, मागील दशकभरात या फंडाने गुंतवणूकदारांना उत्तम परतावा मिळवून दिला आहे.

‘सेबी’च्या वर्गवारीनुसार, मल्टि अलोकेशन श्रेणीत मोडणाऱ्या आयसीआयसीआय प्रु. मल्टि-अ‍ॅसेट फंडाने मागील तीन वर्षांत ८.३६ टक्के तर १० वर्षांत ११.९९ टक्के वार्षिक दराने परतावा दिला आहे. तर ‘हायब्रिड’ श्रेणीत मोडणाऱ्या आयसीआयसीआय प्रु. रेग्युलर सेव्हिंग्ज फंडाने पाच वर्षांत ९.५८ टक्के, तर तीन वर्षांत ७.८७ टक्के परतावा दिला आहे. समभाग व रोख्यांचे संतुलित संमिश्रण असलेल्या अ‍ॅग्रेसिव्ह हायब्रिड फंडाने पाच वर्षांत ९.९६ टक्के, १० वर्षांत १३.०७ टक्के परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे.

आयसीआयसीआय प्रु. बॅलेन्स्ड अ‍ॅडव्हान्स्ड फंडाची जून २०१३ मध्ये ४८७ कोटी रुपयांची असलेली मालमत्ता, सप्टेंबर २०१९ मध्ये २७,९५६ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजे केवळ सहा वर्षांत या योजनेतील गुंतवणूक ५७ पटीने वाढली आहे. अ‍ॅसेट अलोकेटर फंड अशा नवीन अवतारात या फंडाने फेब्रुवारी २०१९ पासून आजपावेतो मालमत्तेत ३,६५९ कोटी रुपयांची नव्याने भर टाकली आहे.