| | डी. पी. सिंग

भारतीयांची मानसिकता ही भौतिक मालमत्तांकडून वित्तीय गुंतवणुकीच्या बाजूने हळूहळू झुकत चालली आहे.  तरी बहुतांशांचा वित्तीय गुंतवणुकीबाबत दृष्टिकोन अजून पुरता सकारात्मक दिसून येत नाही. प्रत्येकाच्या समजुतीची पातळी आणि इच्छा यानुरूप त्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. या नव्या धाटणीच्या गुंतवणूक पर्यायांबाबत माहितीचा अभाव, पर्यायाने धास्ती, गुंतवणुकीसाठी योजनेच्या निवडीबाबत गोंधळ, केव्हा गुंतवावे आणि मुख्य म्हणजे केव्हा त्यातून बाहेर पडावे, या संबंधाने संभ्रमही आहेतच!

कोणाही गुंतवणूकदाराचा प्राथमिक प्रश्न हाच की, ‘यातून मिळणारा परतावा किती?’ परंतु, परताव्यापेक्षा या गुंतवणुकीतून मला काय साध्य करावयाचे आहे, या प्रश्नाची उकल सर्वप्रथम गुंतवणूकदाराने करायला हवी. ‘‘माझ्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट काय?’’ हा प्रत्येक गुंतवणूकदारापुढे पहिला प्रश्न असायला हवा. त्यानुसार मग पसा कशात गुंतवायचा आणि केव्हा काढायचा, हा प्रश्नही आपोआप सुटेल. उद्दिष्टलक्ष्यी गुंतवणुकीने जीवनाच्या प्रत्येक टप्प्यासाठी पाहिलेल्या स्वप्नांचा गुंता सुटत जाईल आणि प्रत्येक स्वप्नानुरूप गुंतवणुकीचे पर्याय हे त्या स्वप्नपूर्तीसाठी उपलब्ध कालावधी आणि जोखीमक्षमता यानुसार ठरेल.

म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीच्या सर्व कालावधीनुरूप (अल्प-मुदत, मध्यम मुदत आणि दीर्घ मुदत) योग्य ते उपाय आणि हर एक जोखीम क्षमतेनुसार (अल्प जोखीम, मध्यम जोखीम आणि उच्च जोखीम) पर्याय सुचवत असल्याने, ते वेगवेगळ्या गुंतवणूकदारांच्या गरजांना अनुकूल ठरतात. धोका पत्करण्याची तयारी व क्षमता आणि गुंतवणुकीसाठी उपलब्ध कालावधी लक्षात घेऊन, योग्य त्या फंडाची निवड येथे सहज शक्य आहे.

उदाहरणादाखल समजून घेऊ. आकस्मिक खर्चाला सामोरे जाण्यासाठी निधी तयार करणे, काहीशी रोख गाठीशी असावी अथवा कुटुंबासह सहलीचे नियोजन यांसारख्या अल्पावधीचे उद्दिष्ट नजरेसमोर असल्यास, लिक्विड फंड, अल्ट्रा-शॉर्ट टर्म अथवा मनी मार्केट फंडांचे पर्याय आहेत. पुढील चार ते पाच वर्षांतील आíथक गरज म्हणून गुंतवणूक करायची झाल्यास, मध्यम मुदतीचे डेट फंड अथवा हायब्रीड फंड आहेत. नवीन स्वमालकीचे घर, मुलांचे उच्च शिक्षण अथवा त्यांचे थाटामाटात लग्न त्याचप्रमाणे सेवानिवृत्तीनंतरच्या जीवनमानाची तरतूद असे १० अथवा अधिक वर्षांनंतर गाठावयाचे वित्तीय उद्दिष्ट असेल तर शुद्ध इक्विटी (समभागसंलग्न) फंड आदर्श ठरेल. काही म्युच्युअल फंडांचे स्वरूपच उद्दिष्टलक्ष्यी असते, जसे टॅक्स सेिव्हग फंड, चिल्ड्रन बेनेफिट प्लान्स आणि रिटायरमेंट फंड्स वगरे.

तुमच्या आíथक नियोजनाच्या दिशेने हे ढोबळमानाने पडलेले पाऊल आहे. त्यात विभिन्न घटकांनुसार – धोका पत्करण्याची आíथक कुवत, उत्पन्नाची पातळी आणि तुमच्यावरील जबाबदाऱ्या व दायित्व, गुंतवणूकयोग्य पशाचे सुयोग्य विभाजन – यानुसार त्यात फेरबदल करणे आवश्यक आहे. म्युच्युअल फंड गुंतवणुकीतही वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्या गुंतवणुकीत धोकेही वेगवेगळे आहेत. जसे इक्विटी वर्गवारीतील लार्ज कॅप फंडांमध्ये गुंतवणुकीतील जोखीम ही सेक्टर फंडापेक्षा नक्कीच कमी आहे. तर दुसऱ्या बाजूला डेट वर्गवारीतील फंडांची जोखीम ही त्या त्या फंडांच्या पोर्टफोलियोतील रोख्यांचा मुदत काळ आणि पत गुणवत्ता यावर बेतलेली असते.

कुठे आणि केव्हा पसा गुंतवावा याच्या इतकेच महत्त्व हे पसा केव्हा गुंतवावा आणि केव्हा त्या गुंतवणुकीतून बाहेर काढावा यालाही आहे. केव्हा बाहेर पडावे या प्रश्नाचा उत्तराला आणखी एक पलू आहे. तो म्हणजे गुंतवणुकीतून कमावलेल्या भांडवली लाभावर (अल्प मुदत अथवा दीर्घ मुदत) करवसुली ही त्या गुंतवणुकीच्या कालावधीशी आणि गुंतवणुकीच्या वर्गवारीशी (इक्विटी अथवा डेट) निगडित आहे. गुंतवणुकीतून बाहेर पडताना पसा कशासाठी हवा, म्हणजेच उद्दिष्ट काय, याचे उत्तर असायला हवे. नियमित उत्पन्नाची गरज असेल तर म्युच्युअल फंडातील सिस्टेमॅटिक विथड्रॉवल प्लान (एसडब्ल्यूपी) या सुविधेचा विचार केल्यास, गुंतवणुकीत कायम राहून त्यावर भांडवली वृद्धीही पुढे मिळत राहील.

जर तुम्ही पुरते निर्णयक्षम असाल आणि निवडलेल्या गुंतवणुकीच्या पर्यायातील धोके समजून घेण्याइतकी जाण असेल तर ‘डायरेक्ट’ अर्थात थेट स्वत:च गुंतवणूक करणे उपयुक्त ठरेल. पण ज्या गुंतवणूकदारांना अशी जाण अथवा सखोल माहिती नाही तर त्यांनी वित्तीय सल्लागारामार्फत गुंतवणूक करायला हवी. या सल्लागाराच्या मदतीने तुमच्या पशातून योग्य गुंतवणुकीसह, ठरलेल्या उद्दिष्टानुरूप, उपलब्ध कालावधी आणि बदलत्या बाजार चक्रांनुरूप परिपूर्ण आíथक नियोजनही आखले जाईल.

(लेखक एसबीआय म्युच्युअल फंडाचे कार्यकारी संचालक व मुख्य विपणन अधिकारी)