मुंबई : तब्बल ८,००० कोटींहून अधिक निधी फसलेल्या वेगवेगळ्या म्युच्युअल फंड घराण्यांनी, सुभाष चंद्र गोयलप्रणीत संकटग्रस्त एस्सेल समूहाच्या प्रवर्तकांना कर्जाच्या पुनर्रचनेसाठी आणि सुयोग्य गुंतवणूकदार मिळविण्यासाठी कालावधी वाढवून द्यावा, अशी मागणी बाजार नियंत्रक ‘सेबी’कडे बुधवारी केली.

एस्सेल समूहाने यापूर्वीच (रविवारी) कर्जदार गैरबँकिंग वित्तीय कंपन्या तसेच म्युच्युअल फंडांबरोबर कर्जाची परतफेड करण्यासाठी सप्टेंबपर्यंत मुदत वाढवून देणारा औपचारिक करार केला आहे. आता ‘सेबी’नेही तो मान्य करावा, अशी म्युच्युअल फंड घराण्यांची मागणी आहे.

एस्सेल समूहाची प्रमुख कंपनी झी एंटरटेन्मेंट इंटरप्रायझेस आणि डिश टीव्ही इंडियाचे गहाणवट समभाग असलेल्या कर्जदारांशी हा करार करण्यात आला आहे. या करारान्वये या कंपन्यांना दिवाळखोरी संहितेअंतर्गत प्रक्रियेन्वये कर्जबुडवे घोषित केले जाणार नाही, तर कंपन्यांचे प्रवर्तकही डिसेंबपर्यंत कर्जफेड पूर्ण करतील. ‘सेबी’नेही या मागणीला सकारात्मकता दाखविल्यास प्रवर्तकांना गहाण असलेले समभाग विकून कंपन्यांवरील मालकी पूर्णपणे गमावण्याच्या नामुष्कीपासून वाचता येईल आणि या दरम्यान धोरणात्मक गुंतवणूकदार शोधण्यालाही मुभा मिळेल.

एस्सेल समूहातील झी आणि डिश टीव्ही या कंपन्यांतील प्रवर्तकांच्या हिश्शाचे बहुतांश समभाग गहाण राखून त्यायोगे मोठी कर्जरक्कम या कंपन्यांनी उभी केली आहे. २५ जानेवारीपासून या कंपन्यांच्या समभागमूल्यात ३३ टक्क्यांहून अधिक गटांगळी घेतली असून, गहाण समभागांचे मूल्यही कर्जाऊ दिलेल्या रकमेपेक्षा खाली आल्याने कर्जदात्या वित्तीय कंपन्या व म्युच्युअल फंडांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

आदित्य बिर्ला सन लाइफचे २,९३६ कोटी अडचणीत

एस्सेल समूहातील कंपन्यांमध्ये आदित्य बिर्ला सन लाइफ, एचडीएफसी, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल, रिलायन्स निप्पॉन लाइफ एएमसी आणि फ्रँकलिन टेम्पल्टन या बडय़ा म्युच्युअल फंड घराण्यांचे एकूण ८,००० कोटी रुपये फसले आहेत. यापैकी केवळ आदित्य बिर्ला सन लाइफची गुंतवणूक ही २,९३६ कोटी रुपयांची आहे. शिवाय एस्सेल समूहातील कंपन्यांमध्ये जवळपास १५० डेट म्युच्युअल फंड योजनांचीही गुंतवणूक आहे. आदित्य बिर्ला सन लाइफच्या २८ योजना, एचडीएफसीच्या ४४ योजना, फ्रँकलिन टेम्पल्टनच्या ९ योजनांतील गुंतवणूक या त्रस्त कंपन्यांशी संलग्न आहे.