लिक्विड फंड तसेच मनी मार्केटमधील गुंतवणूकदारांच्या भरभक्कम प्रतिसादाच्या जोरावर देशातील म्युच्युअल फंडांची एकूण मालमत्ता एप्रिलमध्ये प्रथमच १४.२२ लाख कोटी रुपयांपल्याड गेली आहे. फंडातील गंगाजळीची ही विक्रमी नोंद असून यापूर्वीच्या ऑक्टोबर २०१५ मधील १३.२४ लाख कोटी रुपयांनाही या रूपात मागे टाकले गेले आहे.

भारतात ४३ म्युच्युअल फंड घराणे आहेत. त्यांनी मार्च २०१६ अखेर १२.३३ लाख कोटी रुपये मालमत्ता जमविली होती. यंदा त्यात १.७० लाख कोटी रुपयांचा ओघ नोंदला गेला आहे. उलट आधीच्या- मार्चमध्ये त्यात ७३,११३ कोटी रुपयांची ओहोटी होती. २०१५-१६ ची वित्तवर्ष समाप्तीमुळे गुंतवणूकदारांनी निधी काढून घेतल्याचे मानले जाते.

एप्रिलमध्ये लिक्विड फंड तसेच मनी मार्केट श्रेणीत १.३४ लाख कोटी रुपये आल्याचे म्युच्युअल फंड कंपन्यांची संघटना असलेल्या ‘अ‍ॅम्फी’ने (असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया) म्हटले आहे. ठेव प्रमाणपत्र, रोखे, मुदत ठेवी आदी माध्यमांतून लिक्विड फंडांद्वारे अधिकतर कंपन्या त्यांच्याकडील अतिरिक्त रक्कम गुंतवितात, तर समभागनिगडित म्युच्युअल फंडांमध्ये ४,०४२ कोटी रुपये गुंतविल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या २२ महिन्यांनंतर प्रथमच इक्विटी फंडांमधील गुंतवणुकीचा मार्चमध्ये ऱ्हास झाला होता. तसेच मार्चमधील घसरणीनंतर गिल्ट तसेच गोल्ड ईटीएफमध्ये पुन्हा एकदा एप्रिलमध्ये ओघ दिसून आला आहे.

सर्वाधिक पसंती ‘इन्कम फंडां’ना

म्युच्युअल फंडांच्या एकूण रकमेपैकी सर्वाधिक गुंतवणूक आज स्थिर उत्पन्न देणाऱ्या डेट पर्यायात आहे. सध्या इन्कम फंड श्रेणीत एप्रिलअखेर ६ लाख कोटी रुपये (४८%) गुंतलेले आहेत, तर इक्विटी फंडांमध्ये ४ लाख कोटी रुपये (२८%), लिक्विड फडांमध्ये ३.३७ लाख कोटी रुपये (२४%) व बॅलन्स/हायब्रिड फंडांमध्ये ४०,००० कोटी रुपये (३%) आहेत.