समभागनिगडित म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूकदारांचा ओघ सलग आठवडय़ा महिन्यात कायम राहिला आहे. नोव्हेंबरमध्ये समभाग म्युच्युअल फंडातील ओघ ९,०७९ कोटी रुपये राहिला आहे. समभागनिगडित फंड योजनांमधील एकूण निधी ओघ नोव्हेंबरअखेर ४०,७०६ कोटी रुपयांवर गेला असल्याची माहिती म्युच्युअल फंड उद्योगाचे नेतृत्व करणाऱ्या ‘अ‍ॅम्फी’ने ही गुरुवारी दिली.

म्युच्युअल फंडांकरिता असलेल्या विविध गुंतवणूक योजनांमध्ये समभाग संलग्न फंड योजनांना गुंतवणूकदारांकडून अधिक पसंती दिली जाते. भांडवली बाजाराच्या गेल्या काही महिन्यांतील अधिक परताव्याच्या जोरावर या फंड गुंतवणुकीकडे असलेला कलही वाढला आहे.

नोव्हेंबरमध्ये सलग आठव्या महिन्यात समभागनिगडित म्युच्युअल फंडातील गुंतवणूक वाढती राहिली आहे. तत्पूर्वी मार्च २०१६ मध्ये या पर्यायातील गुंतवणूक रोडावली होती. आता मात्र समभागांबरोबरच डेट फंडांमधील निधी ओघही वाढला आहे.

कंपन्यांचे अधिक लाभातील तिमाही वित्तीय निष्कर्ष आणि वस्तू व सेवा कर विधेयक याच्या आशेवर एकूणच नोव्हेंबरमध्ये भांडवली बाजार व म्युच्युअल फंडांमधील निधी ओघ वाढता राहिला आहे.

म्युच्युअल फंडांमध्ये सिप (नियोजनपद्धतीने गुंतवणूक करण्यात येणाऱ्या योजना) योजनांमध्येही निधी ओघ वाढल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

समभागनिगडित म्युच्युअल फंडातील निधी ओघ वर्षभरापूर्वी, ऑक्टोबर २०१६ मध्ये १६ महिन्यांतील सर्वाधिक नोंदला गेला होता. नोव्हेंबर २०१६ अखेर समभागनिगडित सर्वच फंड योजनांमधील (सिप, ईएलएसएस) एकूण गुंतवणूक ४०,७०६ कोटी रुपये झाली असल्याचे ‘अ‍ॅम्फी’ने स्पष्ट केले आहे. गेल्या महिन्याच्या शेवटी एकूण फंड मालमत्ता ४.६८ लाख कोटी रुपये झाले आहेत.