तिमाहीत ३२.७७ लाख नवगुंतवणूकदार

गुंतवणूकदारांच्या वाढत्या पसंतीमुळे जूनअखेरच्या तिमाहीत म्युच्युअल फंड गुंतवणूकदार खात्यांची संख्या विक्रमी अशा ७.४६ कोटींवर गेली आहे. तिमाहीत ३२.७७ लाख नवीन फंड खाती जोडली गेली आहेत.

देशातील ४२ फंड घराण्याचे नेतृत्व करणाऱ्या ‘अ‍ॅंम्फी’ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल ते जून २०१८ या पहिल्या तिमाहीत ७,४६,२४,२३० असे विक्रमी गुंतवणूकदार खाती (फोलियो) नोंदली गेली आहेत. मार्च २०१८ अखेर असलेल्या ७,१३,४७,३०१ फंड खात्यांमध्ये पुढील तिमाहीत ३२.७७ लाख फंड खात्यांची भर पडली आहे.

आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये  १.६ लाख कोटी गुंतवणूकदारांची भर पडली होती. यापूर्वीच्या पहिल्या दोन वर्षांत प्रत्येकी ५० लाखांहून अधिक गुंतवणूकदार खाती वाढली आहेत.

म्युच्युअल फंडातील समभाग तसेच समभाग संलग्न बचत योजनांचे खातेदार गेल्या तिमाहीत २६.४१ लाखांनी वाढून ५.६२ कोटी झाले आहेत. एकटय़ा समभाग योजनांमध्ये ३२,००० कोटी रुपयांची गुंतवणूक वाढली आहे. तर एकूण फंडांमध्ये १.३४ लाख कोटींचा निधी वाढला आहे. जून २०१८ अखेर एकूण म्युच्युअल फंड निधी २३.४० लाख कोटी रुपये राहिला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून वाढलेल्या अर्थसाक्षरतेपोटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक वाढत आहे. तसेच फंड गुंतवणुकीकडे विशेषत: छोटय़ा शहरांमधून रुपयांचा ओघ अधिक आहे. यामध्ये फंड संघटनेच्या प्रसार मोहिमेचा सिंहाचा वाटा आहे.