छोटय़ा गुंतवणूकदारांचा ऑगस्टमध्येही सक्रिय सहभाग

गुंतवणूकदारांचा उत्साही कल आणि समभागसंलग्न (इक्विटी) फंडांमधील वाढता निधी ओघ यामुळे ऑगस्टमधील म्युच्युअल फंड मालमत्ता २५.२० लाख कोटींच्या विक्रमी टप्प्यावर पोहोचली आहे.

मासिक तुलनेत त्यात ८.४१ टक्के (१.७५ लाख कोटी रुपये) वाढ झाली आहे. आधीच्या, जुलै २०१८ मध्ये एकूण फंड गंगाजळी २३.०६ लाख कोटी रुपये होती. देशातील एकूण ४२ म्युच्युअल फंड घराण्यांकडील गुंतवणूकदारांनी जमा केलेली ही रक्कम आहे.

‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडिया’ (अ‍ॅम्फी) नुसार वर्षभरापूर्वी, ऑगस्ट २०१७ मध्ये एकूण फंड गंगाजळी २०.६ लाख कोटी रुपये होती. अ‍ॅम्फीसह ‘सेबी’च्या गुंतवणूकदार जागृतीसाठी प्रसारामुळे यंदा छोटय़ा गुंतवणूकदारांचा कल अधिक वाढला असून छोटी रक्कम फंडांमध्ये नियोजनबद्धरित्या (एसआयपी) गुंतविण्याचा त्यांचा शिरस्ता कायम राहिल्याचे निरीक्षण फंड संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. एस. व्यंकटेश यांनी नोंदविले आहे.

देशातील फंड उद्योगाने १० लाख कोटी रुपयांचा टप्पा मे २०१४ मध्ये गाठला होता. त्यानंतर तीन वर्षांत, ऑगस्ट २०१७ मध्ये ती दुप्पट, २० लाख कोटी रुपये झाली. आता वर्षभरानंतर तिने २५.२० लाख कोटी रुपयांचा पल्ला गाठला आहे.

गेल्या महिन्यात समभागसंलग्न (इक्विटी) फंड योजनांमध्ये ७,७०० कोटी रुपये आले आहेत. तर इन्कम फंडांमध्ये ६,५०० कोटी रुपये, तर गोल्ड ईटीएफमध्ये ४५ कोटी रुपयांचे निर्गमन झाले आहे.

छोटय़ा गुंतवणूकदारांकडून नियोजनबद्ध म्हणजे ‘एसआयपी’च्या माध्यमातून गुंतवणुकीचा ओघ सलग २९ महिने सकारात्मक वाढीचा, तर एकूण गुंतवणूकदार खात्यांच्या  (फोलियों) संख्येत सलग ५१ व्या महिन्यात दिसलेली वाढ नवगुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडांकडे वाढता कल दर्शविणारा आहे. त्यामुळे २५ लाख कोटींचा हा मैलाचा दगड गाठता आला आहे.    – एन. एस. वेंकटेश, मुख्य कार्यकारी, अ‍ॅम्फी