News Flash

फंडांचीही बँकांच्या समभागांवर भिस्त

फेब्रुवारीअखेर विक्रमी १.२० लाख कोटींची गुंतवणूक

| March 25, 2017 01:31 am

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

फेब्रुवारीअखेर विक्रमी १.२० लाख कोटींची गुंतवणूक

बँकांमधील वाढत्या बुडीत कर्जाचे प्रमाण कमी होण्याबाबतची आशा म्युच्युअल फंड व्यवस्थापकांनाही आहे. परिणामी गेल्या काही दिवसांमध्ये त्यांची बँक समभागांमधील गुंतवणूकही लक्षणीय वाढली आहे. फेब्रुवारीअखेर तर ती विक्रमी अशा १.२० लाख कोटी रुपयांवरदेखील पोहोचली आहे.

वर्षभरापूर्वी, फेब्रुवारी २०१६ मध्ये विविध म्युच्युअल फंड व्यवस्थापकांनी ७१,८६४ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा कल बँक समभागांकरिता दर्शविला होता. तुलनेत यंदाच्या फेब्रुवारीमधील गुंतवणुकीत लक्षणीय वाढ झाली असून गेल्या महिनाअखेरची रक्कम ही आतापर्यंतची सर्वाधिक नोंदली गेली आहे.

टक्केवारीत मात्र हे प्रमाण कमी आहे. म्युच्युअल फंड कंपन्यांच्या समभाग मालमत्ता व्यवस्थापनांतर्गत फेब्रुवारीतील बँकांमधील समभाग फंडांमधील गुंतवणुकीचे प्रमाण २०.५९ टक्के राहिले आहे. जानेवारीत हे प्रमाण २०.९१ टक्के होते. यंदा त्यात किरकोळ घसरण झाली आहे. तर रकमेनुसार मात्र त्यात यंदा वाढ झाली आहे. बँकांमधील समभागसंलग्न फंड गुंतवणूक वर्षभरापूर्वीच्या १,१६,००२ कोटी रुपयांच्या तुलनेत गेल्या महिन्यात १,१९,७९६ कोटी रुपये राहिली आहे.

बँक समभागांमध्ये म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे प्रमाण वाढविण्याचा कित्ता गेल्या काही दिवसांपासून निधी व्यवस्थापकांकडून वाढत आहे. बँकांमधील बुडीत कर्ज प्रमाण कमी होण्याच्या रूपात त्याला पाठबळ मिळत आहे. बँकांचा ताळेबंद स्वच्छ करण्याचे रिझव्‍‌र्ह बँकेचे उद्दिष्ट मार्च २०१७ पर्यंतचे आहे.

निधी व्यवस्थापकांकडूनही सर्व क्षेत्रांमध्ये बँक क्षेत्राला प्राधान्य दिले जात आहे. भांडवली बाजारात निर्देशांकांमध्येही हेच क्षेत्र गेल्या काही दिवसांपासून मोठी वाढ नोंदवीत आहे. यानंतर निधी व्यवस्थापकांकडून पसंती दर्शविले जाणारे माहिती तंत्रज्ञान क्षेत्र आहे. मात्र सध्या या क्षेत्राची वाटचाल चिंताजनक सुरू आहे. या गटात निधी व्यवस्थापकांकडून फेब्रुवारीमध्ये ४६,७९७ कोटी रुपये गुंतविले गेले आहेत. तर त्यानंतरचा क्रम वित्त (४३,७२२ कोटी रुपये), औषधनिर्माण (४१,६९० कोटी रुपये) व वाहन (३७,५१० कोटी रुपये) यांचा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2017 1:31 am

Web Title: mutual fund investment arun jaitley
Next Stories
1 निर्देशांक एक पाऊल मागे, पुढच्या दोन पावलांसाठी!
2 सॅमसंगची मोबाइल पेमेंट सेवा
3 महाभारतावर आधारित गुंतवणुकीसंबंधीचे धडे..
Just Now!
X