व्यापार प्रतिनिधी, मुंबई

आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या वाढत्या किमती आणि डॉलरच्या तुलनेत घसरत्या रुपयामुळे ६ टक्के निर्देशांक आपटी नोंदविणाऱ्या भांडवली बाजारात म्युच्युअल फंडांनी मात्र गुंतवणुकीचे धोरण अवलंबिले आहे.

सप्टेंबरमध्ये बीएसई मिड कॅप निर्देशांकात १३ टक्के घसरण, तर वर्षांरंभापासून तो १९ टक्के गडगडला आहे. या स्थितीत म्युच्युअल फंडांनी बाजारात सूचिबद्ध कंपन्यांमध्ये सप्टेंबरमध्ये ११,६३८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. याच दरम्यान बाजाराचे प्रमुख निर्देशांक मात्र ६ टक्क्यांनी खाली आले होते. तर गेल्या महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी १०,८२५ कोटी रुपये भांडवली बाजारातून काढून घेतले आहे.

विदेशी गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारातून पाय काढून घेतल्यामुळे म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापकांना गुंतवणुकीची संधी मिळाल्याचे मानले जात आहे. किरकोळ गुंतवणूकदारांमार्फत नियोजनबद्ध गुंतवणूक योजनेतील (एसआयपी) ओघ फंड व्यवस्थापकांसाठीही प्रोत्साहन देणारा ठरला आहे.

इन्व्हेस्को मिड कॅप फंडाची समभागात ९७ टक्के गुंतवणूक

मुंबई  : गेल्या काही दिवसांत बाजारात प्रचंड अस्वस्थता आहे. सरलेल्या सप्टेंबर महिन्यात सेन्सेक्स-निफ्टी या प्रमुख निर्देशांक सात टक्क्यांच्या घरात घसरण झाली असून, लार्ज कॅपसह मिड आणि स्मॉल कॅप समभागातही लक्षणीय पडझड दिसली आहे. मात्र या स्थितीतही इन्व्हेस्को मिड कॅप फंडाने समभाग आणि समभाग संलग्न साधनांमध्ये तब्बल ९७.४४ टक्के गुंतवणूक कायम राखली आहे.

तीव्र पडझडीनंतर चे मूल्यांकन वाजवी पातळीवर आलेल्या मिड कॅप समभागातील गुंतवणूक दीर्घावधीत चांगला परतावा देणारी ठरेल, अशी या फंड घराण्याची धारणा आहे. इन्व्हेस्को मिड कॅप फंडाचा पाच वर्षांतील परतावा २९.७५ टक्के इतका असून, याच काळात निफ्टी मिडकॅप (टीआरआय) चा परतावा २६.१६ टक्के असा आहे. सात वर्षे आणि १० वर्षे कालावधीसाठी फंडाचा परतावा अनुक्रमे १९.३८ टक्के आणि १८.३४ टक्के असा आहे, तर संदर्भ निर्देशांकाचा परतावा याच काळात अनुक्रमे १६.८९ टक्के आणि १४.८० टक्के असा आहे.

फंडाच्या विद्यमान गुंतवणुकीत सर्वात मोठा वाटा हा बँका, वाहन तसेच वाहनपूरक उद्योगातील कंपन्यामध्ये असून, तो प्रत्येकी १० टक्क्यांपेक्षा अधिक आहे.