इक्विटी योजनांतील गुंतवणूक १० लाख कोटींवर

मुंबई : देशातील म्युच्युअल फंड गंगाजळी सरलेल्या जुलै महिन्यात पाच टक्क्यांनी वाढली आहे. किरकोळ गुंतवणूकदारांकडून ओघ कायम राहिल्याने गंगाजळीने २३.९६ लाख कोटी रुपयांचे प्रमाण गाठले आहे.

भारतात ४२ म्युच्युअल फंड घराणी आहेत. त्यांच्यामार्फत विविध योजनांतर्गत गुंतवणूकदारांच्या निधीचे व्यवस्थापन फंड कंपन्यांकडून होते. जून २०१८ अखेर ही एकूण गुंतवणूक २२.८६ लाख कोटी रुपये होती. तर वर्षभरापूर्वी, जुलै २०१७ मध्ये ती १९.९७ लाख कोटी रुपये होती.

म्युच्युअल फंड उद्योगाची संघटना असलेल्या ‘अ‍ॅम्फी’द्वारे गेल्या काही वर्षांपासून या गुंतवणूक प्रकाराबाबत जागृतीसाठी विशेष प्रसार व प्रचार मोहीम सुरू आहे; त्याचा योग्य तो परिणाम दिसत असून फंड गंगाजळी महिनागणिक वाढतच आहे, असे संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. एस. व्यंकटेश यांनी सांगितले.

छोटय़ा गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय असलेल्या ‘एसआयपी’तून समभागसंलग्न फंडांकडे या गुंतवणूकदारांचा अधिक ओढा असल्याचे दिसून आले आहे. गेल्या महिन्यात समभागसंलग्न (इक्विटी) फंडातील गुंतवणुकीने  पहिल्यांदा १० लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. तर नव्या फंड खात्यांची (फोलियोंची) संख्याही जुलैअखेर विक्रमी अशा ७.५५ कोटींवर गेली आहे.