18 October 2019

News Flash

Women’s Day 2019 : म्युच्युअल फंड मत्तेचे नियोजन अधिकाधिक महिलांच्या हाती

जानेवारी २०१९ अखेर महिला निधी व्यवस्थापिकांची संख्या २९ वर

जानेवारी २०१९ अखेर महिला निधी व्यवस्थापिकांची संख्या २९ वर

मुंबई : देशात सध्या कार्यरत ४२ म्युच्युअल फंड घराण्यांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेने २५ लाख कोटींचा आकडा गाठला आहे. ‘मॉर्निगस्टार’कडून प्रसृत ३१ जानेवारी २०१९च्या तपशिलानुसार म्युच्युअल फंड उद्योगातील विद्यमान ३४५ निधी व्यवस्थापकांपैकी २९ महिला निधी व्यवस्थापिका कार्यरत आहेत. ३१ जानेवारी २०१७ रोजी १८ महिला निधी व्यवस्थापिका होत्या, तर ३१ जानेवारी २०१८ रोजी २५ निधी व्यवस्थापिका कार्यरत होत्या.

महिला निधी व्यवस्थापिका हाताळत असलेल्या फंडाच्या मालमत्तेपैकी ७४ टक्के मालमत्ता रोखे गुंतवणुकीत तर २६ टक्के मालमत्ता समभाग गुंतवणुकीत असल्याचे ३१ जानेवारी रोजी उपलब्ध माहितीनुसार दिसून येते. म्युच्युअल फंडउद्योगात महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाणदेखील लक्षणीय आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने गुंतवणूकदारांच्या पैशाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या या स्त्रिया त्यांचे पैसे कुठे गुंतवितात याचा आढावा ‘लोकसत्ता’ने घेतला. फंड जगतातील म्युच्युअल फंड वितरक म्हणून कार्यरत असलेल्या एखाद्या वितरकापासून ते ऐडलवाईज म्युच्युअल फंडाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असणाऱ्या राधिका गुप्ता, रिलायन्स म्युच्युअल फंडात स्थिर उत्पन्न योजनांच्या निधी व्यवस्थापिका अंजू छाजेर, आयडीबीआय म्युच्युअल फंडात समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडाच्या निधी व्यवस्थापिका उमा वेंकटरामण, म्युच्युअल फंडाच्या विक्री व्यवस्थापक असलेल्या गौरी पवार यांच्यासारख्या स्त्रियाही स्वत:ची गुंतवणूकही म्युच्युअल फंडात ‘एसआयपी’मार्फतच करतात.

तथापि गुंतवणूकदारांच्या वतीने त्यांच्या फंडात गुंतवणुकीचे निर्णय घेणाऱ्या यापैकी अनेक जणी स्वत:च्या पैशाचे नियोजन करण्यात आपल्या पतीचे किंवा घरातील पुरुषाचे साहाय्य घेतात असेही दिसून आले. गौरी पवार या म्युच्युअल फंडाच्या विक्री विभागात काम करतात. त्यांना त्यांच्या वित्तीय नियोजनाबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, ‘माझे पती घनश्याम हे एका बँकेत उच्च धन संपदा बाळगणाऱ्या ग्राहकांसाठी वित्तीय नियोजन करतात. त्यामुळे आमच्या घरातील गुंतवणूकविषयक निर्णय तेच घेतात.’

त्या म्हणाल्या की, आलेला पगार आमच्याच फंड घराण्याच्या लिक्विड फंडात दरमहा टाकते आणि या लिक्विड फंडातून ‘एसडब्यूपी’च्या साहाय्याने गुंतवणूक केली जाते. ज्या तारखेला ‘एसआयपी’ आहे त्या तारखेला लिक्विड फंडातून ‘एसडब्ल्यूपी’ पद्धतीने रक्कम जमा होते आणि ती इक्विटी फंडात गुंतविली जाते.

कर्जदार महिलांचे प्रमाण वाढून ४८ टक्क्यांवर

मुंबई : महिलांकडून कर्ज मिळविण्यासाठी अर्ज करण्याचे प्रमाण आर्थिक वर्ष २०१४-१५ ते २०१७-१८ या चार वर्षांदरम्यान घसघशीत ४८ टक्के इतके वाढले आहे. या काळात तब्बल ८६ लाख महिलांद्वारे पहिल्यांदाच कर्ज खाते उघडले गेले आहे.

वित्तीय जगतात कर्जदात्यांच्या पतगुणांकांची मोजदाद ठेवणाऱ्या ट्रान्सयुनियन सिबिलने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, देशभरातील महिला कर्जदारांमध्ये ६६ टक्के हिस्सा हा तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यातील महिलांचा आहे. गेल्या चार वर्षांत बँका आणि वित्तसंस्थांकडून महिलांना वितरीत कर्जात सोने तारण कर्जाचा वाटा २०१८ सालात १३ टक्क्यांनी घटला असला तरी, महिलांची कर्ज खाती सर्वाधिक म्हणजे ५६.४ टक्के याच कर्ज प्रकारात आहेत.

स्त्रीच्या आर्थिक समावेशकतेला प्रोत्साहन देणाऱ्या सरकारच्या योजनांचा परिणाम म्हणून महिला कर्जदारांची संख्याही वाढली आहे. विशेषत: ज्या राज्यांत महिला सूक्ष्म-लघू व मध्यम उद्योगांमध्ये अग्रेसर आहेत, त्याच राज्यात महिला कर्जदारांचे प्रमाणही लक्षणीय वाढत आहे, हे विशेषत्वाने ध्यानात घ्यायला हवे, असे ट्रान्सयुनियन सिबिलच्या मुख्य परिचालन अधिकारी हर्षला चांदोरकर यांनी सांगितले.

मी कमवायला लागण्यापूर्वी वडिलांनी माझे पीपीएफ खाते उघडले होते. मी व्यक्तिगत पातळीवर नियोजन केले नसून आमच्या कुटुंबात कौटुंबिक वित्तीय नियोजन होते. रिलायन्स म्युच्युअल फंडात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मासिक वेतन लिक्विड फंडाच्या खात्यात जमा होते आणि मी मूलत: रोखे योजनांचे व्यवस्थापन करीत असल्याने माझ्या वैयक्तिक गुंतवणुकीतही रोखे योजना, लिक्विड फंड यांना स्थान आहे. अन्य वित्तीय ध्येयांसाठी मी समभागसंलग्न फंडात ‘एसआयपी’ करीत असते.

’  अंजू छाजेर, रिलायन्स म्युच्युअल फंड

आमच्या सहा वर्षांच्या मुलीचे शिक्षण आणि निवृत्तीपश्चातच्या निर्वाहासाठी लागणारा निधी या वित्तीय ध्येयांसाठी आम्ही गुंतवणूक करत आहोत. सध्या गुंतवणुकीत ‘पीपीएफ’सारख्या निष्टिद्धr(१५५)त उत्पन्न देणाऱ्या साधनांचे वर्चस्व आहे. खेरीज गुंतवणुकीत समभाग गुंतवणूक करणारे वेगवेगळे फंड, इंडेक्स फंड यांचा समावेश आहे. आम्हाला चक्रवाढ पद्धतीचे फायदे माहीत असल्याने आमच्या बचतीचा निश्चित भाग समभाग गुंतवणुकीत जात असतो.

’ उमा वेंकटरमण,  आयडीबीआय म्युच्युअल फंड

First Published on March 8, 2019 3:01 am

Web Title: mutual fund planning in the hands of women