तेजीत असलेल्या भांडवली बाजाराने निर्माण केलेल्या उत्साहवर्धक वातावरणातून देशातील म्युच्युअल फंड गंगाजळीने सरलेल्या वित्त वर्षात विक्रमी टप्पा गाठला. समभाग संलग्न फंडातील ओघही ऐतिहासिक ठरला आहे. मात्र या दरम्यान ‘एसआयपी’ मार्फत येणारी गुंतवणुकीत मात्र वर्षागणिक घसरण दिसून आली आहे.

नुकत्याच संपलेल्या २०२०-२१ या आर्थिक वर्षात विविध ४२ फंड कंपन्यांच्या १,७३५ योजनांमधील एकूण गुंतवणूक ३१.४२ लाख कोटी रुपये नोंदली गेली आहे. आधीच्या वित्त वर्षातील २२.२६ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा त्यात तब्बल ४१.१७ टक्के वाढ झाली आहे.

‘मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सव्र्हिसेस’च्या म्हणण्यानुसार, इक्विटी फंड, इन्कम फंड तसेच अन्य इटीएफ फंडाच्या प्रतिसादाच्या जोरावर यंदा एकूण गंगाजळी विक्रमी स्तरावर पोहोचली आहे. निफ्टी निर्देशांक ७१ टक्क्याने वाढणाऱ्या या कालावधीत ईएलएसएस व इंडेक्स फंडसह इक्विटी फंडातील मालमत्ताही १०.२० लाख कोटी रुपये अशा ऐतिहासिक स्तरावर पोहोचली आहे.

गेल्या आर्थिक वर्षात वाहन, गैर बँकिंग वित्त कंपन्या, स्थावर मालमत्ता, पायाभूत क्षेत्रातील फंडांमध्ये वाढता निधी ओघ राहिला आहे. म्युच्युअल फंड गुंतवणुकीबाबत आधीच्या वित्त वर्षात तिसऱ्या स्थानावर असलेले हे क्षेत्र यंदा दुसऱ्या स्थानावर राहिले आहे. तर ग्राहकोपयोगी वस्तू, बहुपयोगी वस्तू, दूरसंचार क्षेत्रातील फंडांमध्ये यंदा गुंतवणूक कमी झाल्याचे दिसून आले आहे.

‘एसआयपी’तून ९६ हजार कोटी बाहेर

करोना साथ प्रसार आणि टाळेबंदीने गुंतवणूकदारांच्या उत्पन्नात अस्थिरता निर्माण झाल्याने ‘एसआयपी’सारख्या म्युच्युअल फंड गुंतवणूक पर्यायातून रक्कम कमी झाल्याचे गेल्या वित्त वर्षातील याबाबतच्या आकडेवारीवरून दिसून येते. २०२०-२१ मध्ये एसआयपीतील गुंतवणूक वित्तवर्ष तुलनेत ४ टक्क्यांनी कमी होत ९६,०८० कोटी रुपयांवर येऊन ठेपली आहे. आधीच्या आर्थिक वर्षात या फंड प्रकारात एक लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक होती. सध्या एकूण ३.७३ कोटी एसआयपी फंड खाती आहेत.