मुंबई : दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी नियोजनबद्ध गुंतवणूक अर्थात एसआयपी हे सर्वोत्तम साधन मानले जात असून भारतीय व्यक्तिगत म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचा विश्वास दृढ झाल्याचा प्रत्यय एकूण फंड गंगाजळीतील संबंधित मालमत्तेच्या झालेल्या वाढीने आला आहे. गेल्या पाच वर्षांत एसआयपी खातेधारकांची संख्या वाढल्याचेही एसआयपीमार्फत योगदान आणि एसआयपी गंगाजळीतील एकूण वाढीवरून पुरते स्पष्ट होत आहे.

‘अ‍ॅम्फी’कडून उपलब्ध ताज्या तपशिलानुसार, म्युच्युअल फंडाची एसआयपी गंगाजळी (एयूएम) ३१ मे २०२१ अखेर ४,६७,३६६.१३ कोटी रुपयांवर गेली आहे. चार वर्षांपूर्वी, ३१ ऑगस्ट २०१६ अखेर ती १,२५,३९४ कोटी रुपये होती. त्यात यादरम्यान चारपट वाढ झाली आहे.

गेल्या पाच वर्षांत एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडातील वार्षिक योगदानही दुपटीने वाढले आहे. एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ यादरम्यान ते ४३,९२१ कोटी रुपये होते, तर करोनासारख्या वैश्विक महासाथीने ग्रासलेल्या एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ पर्यंतच्या वर्षांत त्याचे प्रमाण ९६,०८० कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. गेल्या पाच वर्षांत एसआयपी गंगाजळीमध्ये वार्षिक ३० टक्के दराने वाढ झाली आहे. संपूर्ण म्युच्युअल फंड उद्योग एकूण गंगाजळीतील वाढीच्या दरापेक्षा ती दुप्पट आहे.

म्युच्युअल फंडातील मासिक एसआयपी योगदानात २.५२ पट वाढ झाली आहे. ३१ ऑगस्ट २०१६ अखेर याबाबतचे मासिक योगदान ३,४९७ कोटी रुपये आणि ३१ मे २०२१ अखेर योगदान ८,८१८.९ कोटी रुपये होते. जानेवारी २०२१ पासून पहिल्या पाच महिन्यांत एसआयपीद्वारे एकूण योगदान ४२,१४८ कोटी रुपये राहिले आहे.

म्युच्युअल फंड या मालमत्ता वर्गाशी छोटय़ा वैयक्तिक गुंतवणूकदारांच्या जिव्हाळ्यातील चमकदार वाढीचा प्रत्यय म्युच्युअल फंडातील एसआयपी खात्यांच्या संख्येतील गेल्या पाच वर्षांतील वाढ देतो, हेच यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. ३० एप्रिल २०१६ ला १ कोटी असलेली एसआयपी खाती जवळपास चार पटींनी वाढली.