‘सेबी’च्या आदेशामुळे फंडांच्या प्रसाराबाबत आशा

मुंबई : गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडांच्या युनिट्सच्या खरेदी-विक्रीसाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा शेअर बाजारांच्या व्यवहार मंचावर उपलब्ध करून देण्याचा आदेश ‘सेबी’ने दिला आहे. बुधवारी सेबी संकेतस्थळावर याबाबत परिपत्रक प्रसिद्ध झाले आहे.

या सुविधेकरिता नियामकाने अधिकृत शेअर बाजारांबरोबर ‘क्लियरिंग कॉर्पोरेशन’ आणि ‘डिपॉझिटरीज’ यांनादेखील याबाबत योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे म्युच्युअल फंडांच्या थेट योजनांची खरेदी शेअर दलाल किंवा म्युच्युअल फंड वितरकांशिवाय थेट शेअर बाजार मंचावरून खरेदी करणे गुंतवणूकदारांना शक्य होणार आहे.

शेअर बाजाराच्या मंचाची व्याप्ती मोठी असल्याने गुंतवणूकदारांना सेबी मान्यताप्राप्त शेअर बाजाराच्या पायाभूत सुविधांद्वारे म्युच्युअल फंड कंपन्यांकडून म्युच्युअल फंडाची युनिट्स थेट विकत घेण्यासाठी व त्यांची पूर्तता करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे नियामकाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

या निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर म्युच्युअल फंडांच्या थेट योजनांतून निधीचा ओघ वाढण्याची शक्यता आहे. सेबीने फंड घराण्यांना वितरकांच्या मोबदल्याशिवाय असलेल्या अन्य योजना गुंतवणूकदारांना उपलब्ध करून देण्याचा आदेश २०१३ मध्ये दिल्यापासून थेट योजनांतून निधीचा ओघ वाढत आहे.

अशा योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना मध्यस्थांमार्फत मंचावर व्यवहार करावे लागत असे. एमएफ युटिलिटी किंवा वेगवेगळ्या मोबाइल अ‍ॅपच्या साह्य़ाने म्युच्युअल फंडांच्या थेट योजना खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध होत्या. यापैकी काही अ‍ॅपची नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार (आरआयए) म्हणून सेबीकडे झाली असल्याने या कंपन्या म्युच्युअल फंडाच्या थेट योजना विनामूल्य उपलब्ध करून देत होत्या.

सध्या म्युच्युअल फंडांच्या थेट योजनांमध्ये गुंतवणूकदारांना विशिष्ट म्युच्युअल फंडाच्या संकेतस्थळावर जाऊन गुंतवणूकदार म्हणून नोंदणी करावी लागते. सेबीच्या या निर्णयामुळे म्युच्युअल फंडाच्या थेट विकल्पाच्या युनिट्सची खरेदी सुलभ होईल. या निर्णयामुळे म्युच्युअल फंडाचा प्रसार ३० शहरांपलीकडे सक्षमरीत्या होण्याची अपेक्षा आहे.

सध्या म्युच्युअल फंडांच्या थेट योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना मोबाइल अ‍ॅप आणि म्युच्युअल फंडांच्या संकेतस्थळांवरून ती करता येते. सेबीच्या नव्या निर्णयामुळे म्युच्युअल फंडाच्या योजनांची व्याप्ती वाढेल. – राधिका गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी, एडेल्वाइस म्युच्युअल फंड

म्युच्युअल फंड विक्री सुविधा भांडवली बाजार उपलब्ध करून देत आहे. मात्र फंड सेवेचा अनुभव या मंचाला नाही. भांडवली बाजारामार्फत थेट योजना उपलब्ध झाल्यावर बाजारांनाही सेवा सुधारावी लागेल. परिणामी सेबीच्या सूचनेची अंमलबजावणी कितपत पूर्ण होईल याबाबत शंका आहे. – श्रीकांत मीनाक्षी, सह-संस्थापक, प्राइमइन्व्हेस्टर