म्युच्युअल फंडांनी सरलेल्या एप्रिल महिन्यात शेअर बाजारातून सुमारे २,७०० कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे, तर त्याच महिन्यात रोखे बाजारात (डेट मार्केट) तब्बल ५०,००० कोटी रुपये नव्याने गुंतविले आहेत.
‘सेबी’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, सलग आठव्या महिन्यात म्युच्युअल फंडांची शेअर बाजारातील विक्री ही खरेदीपेक्षा अधिक राहिली आहे. यापूर्वी ऑगस्ट २०१३ मध्ये म्युच्युअल फंडांनी विक्रीपेक्षा अधिक १,६०७ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची नक्त खरेदी केली आहे. म्युच्युअल फंड नक्त विक्रेते राहिलेल्या याच आठ महिन्यांत विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची (एफआयआय) शेअर बाजारात जोमदार खरेदी सुरू आहे. सेबीद्वारे प्रसृत एप्रिल महिन्याच्या आकेडवारीनुसार, म्युच्युअल फंडांची शेअर बाजारातील नक्त विक्री ही २,६९८ कोटी रुपयांची होती.
शेअर बाजारात निवडणूकपूर्व ऐतिहासिक तेजीचा अव्याहत प्रवाह सुरू असताना, २०१४ सालच्या प्रारंभापासून आजतागायत म्युच्युअल फंडांनी तब्बल १०,४५० कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली आहे. तर याच काळात त्यांनी रोखे बाजारावर गुंतवणुकीसाठी भरवसा दाखविताना, तब्बल २.५७ लाख कोटी रुपये या चार महिन्यांमध्ये गुंतविले आहेत. किंबहुना, शेअर निर्देशांक ऐतिहासिक उच्चांकी स्तरावर असताना, सामान्य गुंतवणूकदार इक्विटी फंडांतील गुंतवणूक काढून (रिडम्प्शन) घेत असल्याचा हा परिणाम असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. तथापि निवडणूक निकालानंतर, केंद्रात स्थिर सरकार आल्यास मात्र गुंतवणूकदारांचा इक्विटी फंडात दीर्घावधीच्या गुंतवणुकीचा कल वाढीला लागेल.