ग्रामीण गुंतवणूकदारांचे लक्ष वेधण्यासाठी प्रस्तावित योजनांचे ‘हिंदी’ नामकरण
गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झालेल्या विश्वास आणि आस्थेच्या वातावरणाचा लाभ घेण्यासाठी विविध फंड घराण्यांनी चालू वर्षांत ३० नवीन म्युच्युअल फंड योजना (एनएफओ) दाखल करण्यासाठी ‘सेबी’कडे प्रस्ताव दाखल केले आहेत. उल्लेखनीय म्हणजे निमशहरी व ग्रामीण गुंतवणूकदारांचे लक्ष वेधण्यासाठी अनेक योजनांना प्रथमच चपखल हिंदी भाषक नावे सुचविली गेली आहेत.
म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे सार्वत्रिकीकरणाचा ध्यास घेत ‘सेबी’ देशातील १५ बडय़ा शहरांबाहेर (बी १५) गुंतवणूकदार मिळविण्यासाठी फंड घराण्यांना प्रोत्साहित करण्याचे धोरण गेल्या काही वर्षांपासून अनुसरले आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे नव्याने वाढलेले गुंतवणूकदार आणि एकूण गुंतवणूक गंगाजळीत ग्रामीण भागाच्या वाढत्या वाटय़ावरून स्पष्ट होते.
फंड घराण्यांकडून शहरांबाहेरील गुंतवणूकदारांमध्ये राबविण्यात येत असलेल्या शिक्षण व जागरणाच्या प्रयत्नांचा परिपाक म्हणूनही वाढलेल्या गुंतवणुकीकडे पाहता येईल. आता त्या पुढचे पाऊल म्हणून फंड घराण्यांनी त्यांच्या योजनांना असलेला इंग्रजी तोंडवळा बदलून, त्याचेही हिंदीकरण सुरू केले आहे. चालू वर्षांत ‘सेबी’कडे दाखल झालेल्या नव्या योजनांच्या प्रस्तावांमध्ये निवृत्ती योजना, स्थिर मुदतपूर्ती योजना (एफएमपी) आणि काही समभागसंलग्न (इक्विटी) योजनांचा समावेश आहे. त्यांचे नामकरण करताना, लहानग्यांच्या भविष्यासाठी गुंतवणूक उद्दिष्ट असलेल्या योजनेचे ‘बाल विकास योजना’, तर कर वजावटीचा लाभ देणारी योजना ‘कर बचत योजना’, स्थिर उत्पन्न योजनांना ‘बचत योजना’, ‘निवेश लक्ष्य’ असे अस्सल ‘देशी’ नामाभिधान योजण्यात आले आहे. या प्रांगणात नव्याने दाखल झालेल्या महिंद्र अँड महिंद्र समूहाचे महिंद्र म्युच्युअल फंड आणि रिलायन्स म्युच्युअल फंड यांच्याकडून हे भाषिक प्रयोग आजमावले जाणार आहेत.
म्युच्युअल फंड गुंतवणूक अधिकाधिक सोपी व सहजसाध्य बनावी असा हा प्रयत्न आहे. योजनेच्या नावातून गुंतवणूक करण्यामागचे उद्दिष्ट स्पष्ट झाल्यास गुंतवणुकीचा निर्णयही सोपा बनेल, असे यासंबंधी बोलताना महिंद्र अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी आशुतोष बिश्नोई यांनी सांगितले.
म्युच्युअल फंडातील व्यक्तिगत गुंतवणूकदारांच्या संख्येने मार्च २०१६ अखेर ४.७६ कोटींचा सार्वकालिक उच्चांकी स्तर गाठला आहे. त्यात शहरांपलीकडच्या गुंतवणूकदारांची संख्या लक्षणीय ४० टक्क्यांच्या घरात जाणारी असल्याचे दिसून येत आहे.