मुंबई : ढासळता भांडवली बाजार आणि घसरता रुपया यामुळे एकूणच अस्वस्थता नोंदविलेल्या सप्टेंबर महिन्यात म्युच्युअल फंडांनाही सुमार कामगिरीला सामोरे जावे लागले आहे. गेल्या महिन्यात फंडांची मालमत्ता तब्बल ३.१४ लाख कोटी रुपयांनी रोडावली आहे.

सप्टेंबर २०१८ अखेर म्युच्युअल फंडांची मालमत्ता २२.०६ लाख कोटी रुपये नोंदली गेली आहे. आधीच्या, ऑगस्टमध्ये ती थेट २५.२० लाख कोटी रुपये अशी सर्वोच्च टप्प्यावर होती. लिक्विड तसेच इन्कम फंडातील ओहोटीचा फंडांवर विपरित परिणाम झाला आहे.

‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया’ या देशातील ४१ फंड घराण्यांचे नेतृत्व करणाऱ्या संघटनेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, यंदा लिक्विड फंड योजनांमधील निधी २.११ लाख कोटी रुपयांनी कमी झाला आहे. तसेच डेट फंडातील निधीऱ्हास ३२,५०४ कोटी रुपयांचा आहे.

गेल्या महिन्यातील भांडवली बाजारातील पडझड तसेच आयएल अँड एफएसच्या थकित कर्जफेडीच्या हप्त्याचा मोठा परिणाम म्युच्युअल फंडांवर झाल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. आयएल अँड एफएसमध्ये अनेक आघाडीच्या फंड कंपन्यांची गुंतवणूक आहे. तसेच यामुळे गृहवित्त कंपन्यांच्या समभागांमध्ये प्रचंड अस्वस्थतता नोंदली  गेली.

विदेशी गुंतवणूकदारांकडून वाढती गुंतवणूक

मुंबई : पी-नोट्स या विदेशी गुंतवणूकदारांकडून थेट माध्यमातून होणारी गुंतवणूक ऑगस्टअखेर वाढली आहे. समभाग, रोखे तसेच वायदा पर्यायातील विदेशी गुंतवणूकदारांची रक्कम चालू वर्षांत (ऑगस्टपर्यंत) ८४,६४७ कोटी रुपये झाली आहे. यापूर्वी सर्वाधिक गुंतवणूक ऑक्टोबर २०१७ मध्ये होती. पी-नोट्सद्वारे विदेशी गुंतवणूकदारांना विविध पर्यायांमध्ये थेट रक्कम गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध आहे. थेट विदेशी गुंतवणूकदारांची यंदाची रक्कम ही गेल्या १० महिन्यातील सर्वोत्तम राहिली आहे. जुलै २०१८ अखेर ही रक्कम ८०,३४१ कोटी रुपये होती.

१२८ कंपन्यांमार्फत ५.२४ अब्जची निधी उभारणी

मुंबई : भांडवली बाजारातील प्रारंभिक खुल्या भागविक्रीतून २००८ मध्ये १२८ कंपन्यांनी ५.२४ अब्ज डॉलरची निधी उभारणी केली आहे. ऑगस्टपर्यंतची ही रक्कम असल्याचे ईवाय या लेखा परीक्षण आस्थापनाने म्हटले आहे.

२०१८-१९ च्या दुसऱ्या तिमाहीत झालेली प्रारंभिक खुल्या विक्रीच्या माध्यमातील निधी उभारणी ही संख्या ही वर्षभरापूर्वीच्या कंपन्यांच्या तुलनेत कमी असल्याचे निरिक्षणही ईवायने (पूर्वाश्रमीची अर्न्‍स्ट अँड यंग) नोंदविले आहे.

जून ते ऑगस्ट दरम्यान ११ कंपन्यांनी प्रारंभिक खुली भागविक्री प्रक्रिया पार पाडली होती. यंदाच्या वर्षांत, याच कालावधीत ८ कंपन्यांनी त्यांचे समभाग जारी केले. येत्या कालावधीत आणखी काही कंपन्या येतील, असे नमूद करण्यात आले.

सेबीची प्रारंभिक खुल्या भागविक्रीकरिता पुराणिक बिल्डर्ससह चार कंपन्यांना परवानगी

मुंबई : पुराणिक बिल्डर्ससह चार कंपन्यांना सेबीने सोमवारी प्रारंभिक खुल्या भागविक्रीकरिता परवानगी दिली. आस्क इन्व्हेस्टमेंट, निहिलेन्ट व मुथूट मायक्रोफिन या अन्य तीन कंपन्यांनाही भांडवली बाजारातून निधी उभारणीसाठी नियामक यंत्रणा सेबीने हिरवा कंदील दाखविला आहे.

यंदा परवानगी मिळालेल्या कंपन्यांमध्ये एक स्थावर मालमत्ता, एक संपत्ती व्यवस्थापन तर अन्य दोन या माहिती तंत्रज्ञान सुविधा पुरविणाऱ्या कंपन्या आहेत. या कंपन्यांनी जून ते ऑगस्ट दरम्यान सेबीकडे अर्ज केला होता. आघाडीची स्थावर मालमत्ता पुराणिक बिल्डर्सची प्रारंभिक खुली भागविक्री प्रक्रिया १,००० कोटी रुपयांची असेल.

‘एनएसई-युनिसेफकडून गुंतवणुकीचे आवाहन

मुंबई : युनिसेफच्या कार्यकारी संचालक हेनरिएट्टा फोर यांनी सोमवारी राष्ट्रीय शेअर बाजाराच्या पारंपरिक घंटानादनिमित्त  लहान मुले व तरुणांमध्ये गुंतवणूक करण्याची गरज विशद केली.

‘नॅशनल स्टॉक एक्स्चेंज’चे व्यवस्थापकीय संचालक विक्रम लिमये, युनिसेफ इंडियाचे प्रतिनिधी डॉ. यास्मिन अली हक आणि ओयो रुम्सचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी रितेश अग्रवाल आदी यावेळी उपस्थित होते.

यापूर्वी नवी दिल्लीत युनिसेफने तरुण व्यक्तींसाठींच्या गुंतवणूकविषयक व्यासपीठाची घोषणा केली होती.