डिसेंबरमध्ये शेअर निर्देशांकांनी गाठलेले उच्चांकी शिखर आणि गेल्या तिमाहीपासून बाजारातील तेजीच्या पाश्र्वभूमीवर म्युच्युअल फंडांच्या निधी व्यवस्थापकांनी आपला होरा बँकिंग समभागांकडे वळविलेला स्पष्टपणे दिसून येतो. रिझव्‍‌र्ह बँकेनेही बँकिंग क्षेत्राच्या उभारीकरिता उचललेली पावले निधी व्यवस्थापकांसाठी आश्वासक ठरली आहेत.
भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’कडे उपलब्ध ताजी माहिती दर्शविते की, डिसेंबर २०१३ अखेर म्युच्युअल फंडांची बँकिंग समभागांमधील गुंतवणूक ही ३४,१५३ कोटींवर पोहचली आहे, जो गत सहा महिन्यांतील उच्चांक आहे. म्युच्युअल फंडांच्या इक्विटी योजनांकडे जमा गुंतवणूकयोग्य मालमत्ता (गंगाजळी) रु. १.९३ लाख कोटी असून, त्यापैकी १७.६६ टक्के केवळ बँकिंग समभागांमध्ये गुंतले आहेत, असेही हे आकडे दर्शवितात.
जून २०१३ नंतर बँकिंग क्षेत्राबाबत स्वारस्याचा हा उच्चांक आहे. जूनमध्ये सर्व इक्विटी योजनांच्या निधी व्यवस्थापकांनी बँकिंग क्षेत्रात ३५,४४२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्या आधी एप्रिल २०१३ मध्ये एकूण इक्विटी गंगाजळीत बँकिंग क्षेत्राचा वाटा २०.८४%, मे मध्ये २०.१०% असा होता. या आधीचा उच्चांक जूनमधील १९.६३% स्वारस्य हे जुलैमध्ये १६.९३ टक्क्य़ांवर घसरले. विशेषत: बँकांमधील वाढती थकीत कर्जाची मात्रा आणि कमजोर रूपया यामुळे म्युच्युअल फंडांची या क्षेत्राबद्दल रुची कमी होत गेली. इक्विटी योजनांची गुंतवणूक बँकांकडून आयटी क्षेत्राकडे वळत गेली. पण पुन्हा नोव्हेंबरपासून ती वाढत गेली आणि त्या महिन्यात बँकिंग समभागांमधील गुंतवणूक ३२,४१६ कोटी रुपये पातळीवर गेली.
प्रामुख्याने सप्टेंबरमध्ये रिझव्‍‌र्ह बँकेचे २३ वे गव्हर्नर म्हणून रघुराम राजन यांचे पदग्रहण आणि त्यांनी बँकिंगप्रणालीत उदारता, विशेषत: रुपयाच्या स्थिरतेच्या समर्थनार्थ विदेशातून कर्जउभारणीच्या धोरणात बँकांसाठी आणलेली शिथिलता, नवीन शाखा उघडण्याच्या प्रक्रियेत आणलेली सुलभता या बाबी निधी व्यवस्थापकांना भावणाऱ्या ठरलेल्या दिसतात. म्हणून सप्टेंबर ते डिसेंबर २०१३ तिमाहीत त्यांची बँकिंग समभागांमधील गुंतवणूक उंचावत गेली आहे.
बँकिंग क्षेत्र       ३४,१५३   ७.६६%
आयटी क्षेत्र      २६,७६२   ३.८४%
औषधी क्षेत्र      १५,६०३   ८.०७%
ग्राहक उत्पादने     १३,१८६    ६.८२%
तेल व वायू क्षेत्र    १०,०४५    ५.१९%
म्युच्युअल फंडांच्या गुंतवणुकीची अव्वल पाच उद्योगक्षेत्रे
(कोटी रु.)
(म्युच्युअल फंडांच्या इक्विटी गंगाजळीची ही डिसेंबर २०१३ अखेर विभागणी असून, एकूण गंगाजळी १,९३,३०० कोटी रुपये होती.)