करोनाचा प्रसार थंडावल्यानंतर व टाळेबंदीत शिथिलता आल्यानंतर स्थिरावत असलेल्या आर्थिक उत्पन्नाची मात्रा देशातील म्युच्युअल फंड गुंतवणुकीवर परिणामकारक ठरली पडली आहे. गुंतवणूकदार पुन्हा एकदा म्युच्युअल फंड पर्यायाकडे वळल्याने एकूण फंड मालमत्ता डिसेंबर २०२० अखेर २९.७१ लाख कोटी रुपये झाली आहे.

तिमाही तुलनेत यात ७.६ टक्के वाढ झाली आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत एकूण म्युच्युअल फंड गंगाजळी २७.६० लाख कोटी रुपये होती. भांडवली बाजारातील तेजीमुळे गेल्या तिमाहीत फंड मालमत्तांना बहर आल्याचे मानले जाते.
देशात ४५ फंड घराण्यांच्या विविध योजना आहेत. पैकी ४२ फंड कंपन्या कार्यरत आहेत. त्यातही एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल, आदित्य बिर्ला सनलाइफ या चार फंड कंपन्यांचा एकूण फंड गंगाजळीत निम्मा हिस्सा आहे.

अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंड कंपनीची मालमत्ता गेल्या तिमाहीत १३.६ टक्क्यांनी वाढून १.७७ लाख कोटी रुपये झाली आहे. तर डीएसपीची गंगाजळी ८९,४८७ कोटी रुपये आहे.

गेल्या तिमाहीत ऑक्टोबरमध्ये निफ्टी-५० ३.१५ टक्क्यांनी, नोव्हेंबरमध्ये १२.०२ टक्क्यांनी, तर अखेरच्या – डिसेंबरमध्ये १४.९ टक्क्यांनी वाढल्याकडे ‘फायर्स’ या गुंतवणूक अभ्यासविषयक संस्थेचे संशोधन प्रमुख गोपाल कवलीरेड्डी यांनी लक्ष वेधले आहे.

भांडवली बाजाराशी संबंधित समभाग संलग्न म्युच्युअल फंड योजनांमध्ये वाढ झाल्याने एकूण फंड मालमत्ता वाढल्याचे सॅम्को या दलालीपेढीचे प्रमुख ओंकेश्वर सिंह यांनी म्हटले आहे.