07 March 2021

News Flash

म्युच्युअल फंड मालमत्तेत बँक ठेवींच्या पाचव्या हिश्शापर्यंत अभूतपूर्व वाढ

घसरत्या व्याजदराच्या स्थितीत डेट फंडांकडे वाढता कल

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

घसरत्या व्याजदराच्या स्थितीत डेट फंडांकडे वाढता कल

ऑगस्टअखेर म्युच्युअल फंडांतील गुंतवणूकदारांच्या गंगाजळीने २० लाख ६० हजार कोटी रुपयांचा विक्रमी स्तर गाठला. बँकांमधील एकंदर १०६.७ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत हे प्रमाण एक-पंचमांश इतके होईल, अशा अभूतपूर्व स्तरावर गेले आहे. मार्च २०१४ अखेर म्युच्युअल फंडांची गंगाजळी ही त्या वेळच्या बँक ठेवींच्या तुलनेत दहावा हिस्सा इतकी होती. परतावादृष्टय़ा सरस अशा वित्तीय योजनांमध्ये गुंतवणुकीकडे वाढलेला कल याला कारणीभूत असण्याबरोबरच, बँकांकडून ठेवींवरील व्याजदरात होत असलेली कपातही जबाबदार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

देशातील बहुतांश बँकांनी गेल्या महिनाभरात बचत खात्यातील शिलकीवरील व्याजदरात अर्धा टक्क्य़ांपर्यंत कपात करून ते ३.५० टक्क्य़ांवर आणले आहेत. मुदत ठेवींवरील व्याजाचे दरही घसरले असून, ते वार्षिक ६.५० ते ७ टक्क्य़ांवर उतरले आहेत. अशा वेळी बँक ठेवींप्रमाणे सुरक्षितता आणि खात्रीशीर परतावा हवा असलेल्या गुंतवणूकदारांचा ओढा हा म्युच्युअल फंडाच्या डेट फंड अर्थात रोख्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या योजनांकडे वळला आहे. विशेषत: स्थिर स्वरूपात व नियमित उत्पन्न हवे असलेल्या गुंतवणूकदारांसाठी हा पर्याय गत तीन वर्षांत चांगलाच फलदायीही ठरल्याचे दिसून येत आहे.

विशेषत: मुद्दल गमावण्याच्या भीतीपोटी अनेक वर्षे म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीकडे पाठ केलेल्या बचतदारांनी सुरुवात करताना, ‘डायनॅमिक’ धाटणीच्या रोखे योजनांचा पर्याय निवडणे श्रेयस्कर ठरते. म्युच्युअल फंडातील रोखे योजनांच्या अनेक प्रकारांतील हा नवगुंतवणूकदारांसाठी आदर्श पर्याय सांगितला जातो. विशेषत: काही वर्षांसाठी आपला बचतीचा पैसा सुरक्षितपणे गुंतवून ठेवण्याचा मानस असलेल्या गुंतवणूकदारांनी डायनॅमिक डेट फंडांची निवड करणे सुचविले जाते.

या वर्गवारीतील योजनांचा गेल्या वर्षभरातील परतावा हा सरासरी ९.६ टक्क्य़ांच्या घरात जाणारा आहे, जो मुदत ठेव योजनांच्या तुलनेत खूपच सरस परतावा आहे. तर या वर्गवारीत आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाँग टर्म प्लानने गेल्या कैक तिमाहीत सातत्यपूर्ण चांगला परतावा देऊन कामगिरीत वरचा क्रमांक मिळविला आहे. गेल्या वर्षभरातील तिचा परतावा हा ११.२० टक्के असून, तीन वर्षे, पाच वर्षे आणि सात वर्षे कालावधीतील परतावा अनुक्रमे १२.६० टक्के, १२ टक्के आणि ११ टक्के असा उमदा राहिला आहे. याच कालावधीत पारंपरिक गुंतवणूक आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाँग टर्म प्लानने स्थापनेपासून १०.६० टक्के सरासरी परतावा दिला आहे, त्याच वेळी फंडाच्या संदर्भ निर्देशांकाचा परतावा ८.६१ टक्के इतका आहे.

निवड नेमकी कशाची करावी?

पारंपरिक बचतदारांनी नवीन वाट चोखाळताना, म्युच्युअल फंडांचा गुंतवणूक पर्याय अजमावयाला सुरुवात केली आहे. मात्र म्युच्युअल फंडातील कोणत्या प्रकारच्या रोखे योजनांची निवड करावी हे खूपच महत्त्वाचे आहे. रोख्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या या सर्व योजना असल्या तरी कोणत्या व किती मुदतपूर्ती कालावधीच्या रोख्यांमध्ये त्यांची गुंतवणूक आहे, यावरून त्यांच्या परतावा-जोखमीचे स्वरूप बदलते, असे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल असेट मॅनेजमेंट कंपनीचे वरिष्ठ निधी व्यवस्थापक मनीष बांठिया यांनी सांगितले. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाँग टर्म प्लानचे स्वरूप हे गतिमान (डायनॅमिक) व्यवस्थापनाचे असल्याने, बाजार प्रवाहाला अनुसरून रोख्यांचा कालावधीसंबंधी धोरण हे आवश्यकतेप्रमाणे बदलण्याची मुभा व कौशल्य निधी व्यवस्थापकाकडे असते. सध्याचे संकेत हे व्याजाचे दर घसरत जाण्याचे असल्याने लांबच्या अवधीच्या रोख्यांमध्ये  गुंतवणुकीचे डायनॅमिक डेट फंडांचे धोरण, प्रवाहातील बदलासरशी त्वरेने बदलेल. संदर्भ निर्देशांकापेक्षा आणि एकंदर या वर्गवारीतही सरस कामगिरी अशा फंडांना यामुळेच करता येते, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2017 1:49 am

Web Title: mutual funds investment increase
Next Stories
1 अग्रिम कर संकलनात १०.६ टक्के वाढ
2 ट्विटरच्या वरिष्ठ पदावर श्रीराम कृष्णन यांची नियुक्ती
3 आठवडय़ाची मुलाखत : ‘मिळकतीतील वृद्धी अजून दोन तिमाही दूरच!’
Just Now!
X