मुंबई : गेल्या काही दिवसांत भांडवली बाजारात सातत्यपूर्ण तेजीची दौड, गेल्या वर्ष-दीड वर्षांत झाकोळले गेलेल्या मिडकॅप समभागांना पुन्हा चांगले दिवस आल्याचेही सांगून जाते. गेल्या वर्षभरात अनेक चांगले मिडकॅप समभाग ५० टक्के वा त्याहून अधिक प्रमाणात गडगडले आहेत. त्यामुळे सध्याच्या तेजीत मिडकॅप आकर्षक भावात व सुयोग्य मूल्यांकनाला उपलब्ध आहेत.

बाजार विश्लेषकांच्या मते, येणाऱ्या तिमाहीत कंपन्यांच्या मिळकतीत सुधारणा दिसण्याची आशा आहे. हे पाहता मध्यम कालावधीत मिडकॅप समभागांची चांगली कामगिरी राहू शकेल. गुंतवणूकदारांनी भागभांडारात मिडकॅप समभागांना स्थान देण्याची हीच सुयोग्य वेळ आहे. कारण ज्यावेळी कंपन्यांच्या मिळकतीत अपेक्षित सुधार दिसेल त्यावेळी मिडकॅप समभागांमधील वाढीचे प्रत्यक्ष लाभ उचलता येतील.

विद्यमान बाजार तेजीतून, विशेषत: अंतरिम अर्थसंकल्पानंतर अनेक मिड कॅप समभाग जवळपास १० टक्क्य़ांनी वधारले आहेत. तर मागील १५ वर्षांत म्हणजे २००४ सालापासून या समभागांनी वार्षिक सरासरी १४.४० टक्के दराने परतावा दिला आहे. त्यामुळे अल्पकाळात मोठी अस्थिर कामगिरी असली, तरी या क्षेत्राची दीर्घावधीतील कामगिरी दमदारच राहिली आहे.

तरीही सावधगिरी म्हणून थेट समभागांत गुंतवणूक करू न इच्छिणाऱ्या जोखीम-दक्ष गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडांचा पर्याय निवडावा, असेही नियोजनकारांचे म्हणणे आहे. म्युच्युअल फंडांत, जर इन्व्हेस्कोच्या मिडकॅप फंडांची कामगिरी पाहिली तर मागील पाच वर्षांत २१.२६ टक्के, सात वर्षांत १९.६४ आणि १० वर्षांत २४.३२ टक्के अशी त्यांची परतावा कामगिरी आहे. त्याच वेळी निफ्टी मिडकॅप निर्देशांकाचा याच कालावधीत परतावा अनुक्रमे १८.८४ टक्के, १४.६१ टक्के आणि १९.०४ टक्के असा आहे. बाजार भांडवलाच्या मानाने १०१ ते २५०व्या स्थानादरम्यानचे समभाग हे मिडकॅप म्हणून गणले जातात.   इन्व्हेस्कोच्या या फंडाची साधारण ३०-३४ समभागांमध्ये आणि सर्वाधिक गुंतवणूक ही औद्योगिक, आरोग्यनिगा, ग्राहकोपयोगी उत्पादने आदी क्षेत्रात आहे. या फंडातील एसआयपी गुंतवणुकीचा परतावाही गेल्या पाच वर्षांत १०.७१ टक्क्य़ांचा आहे.