छोटय़ा गुंतवणूकदारांची पसंती असलेल्या म्युच्युअल फंडांत नियमित गुंतवणुकीची पद्धत अर्था ‘एसआयपी’मध्ये गेल्या आर्थिक वर्षांत १८ टक्के वाढ नोंदली गेली असून त्यातील रक्कम ७३ लाख रुपये झाली आहे.
एसआयपी ही म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील योजना छोटय़ा गुंतवणूकदारांचा पसंतीचा पर्याय राहिला आहे. हे हेरूनच फंड कंपन्याही याच धाटणीच्या अधिकाधिक योजना सादर करत असतात. महिन्याला तसेच ठरावीक कालावधीत निश्चित व छोटी रक्कम फंडांमध्ये गुंतविण्याचा हा पर्याय सुलभही मानला जातो.
हाती आलेल्या आकडेवारीनुसार, मार्च २०१५ अखेर एसआयपीतील गुंतवणूक ७३.०५ लाख रुपये झाली असून ती आधीच्या अर्थ वर्षांतील ६२.१० लाख रुपयांहून १८ टक्के अधिक आहे. एसआयपीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये मोठय़ा शहरातील गुंतवणूकदारांचे प्रमाण वाढल्याचेही निदर्शनास आले आहे.
म्युच्युअल फंड कंपन्यांमार्फत १२ लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीचे व्यवस्थापन सध्या केले जात आहे. कंपन्यांच्या अधिकाधिक योजना या समभागांशी निगडित आहेत.

छोटय़ांचे फंड मालमत्तेतील योगदानही वाढले
ल्ल देशातील ४४ फंड घराण्यांनी प्रस्तुत केलेल्या विविध योजनांमधील छोटय़ा गुंतवणूकदारांचा हिस्सा मार्च २०१५ अखेर तब्बल ५१ टक्क्यांनी वाढला असून त्यातील रक्कम २,४३,५६९ लाख कोटी रुपये झाली आहे. (शेजारची चौकट पाहा). गुंतवणूकदारांची रिलायन्सच्या योजनांमध्ये सर्वाधिक ९५ टक्के हिस्सेदारी वाढली आहे. २०१३-१४ मधील म्युच्युअल फंडांतील छोटय़ा गुंतवणूकदारांचा हिस्सा १,६१,७८३ कोटी रुपयांचा होता. मुंबई, दिल्लीसारख्या मोठय़ा शहरांमधून यंदा फंड ओघ वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

7