जोखीमरहित करमुक्त रोख्यांमध्ये गुंतवणुकीची चालू आर्थिक वर्षांतील गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध झालेली शेवटची संधी बुधवार, ९ मार्चला खुली होत आहे. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्डने प्रत्येकी १००० रु. दर्शनी मूल्याच्या करमुक्त, सुरक्षित आणि पुनर्विक्री करता येण्याजोगे अपरिवर्तनीय कर्जरोखे (बाँड्स) विक्रीला काढले आहेत. सरकारच्या या विकासात्मक वित्तीय संस्थेने या रोखेविक्रीतून ३५०० कोटी रुपये उभारणे प्रस्तावित केले आहे, ज्यापैकी २१०० कोटी रु. किरकोळ व्यक्तिगत गुंतवणूकदारांकडून (१० लाख रुपयांपेक्षा कमी रोख्यांसाठी अर्ज करणाऱ्या) उभारले जातील.
९ मार्च रोजी रोखे विक्री खुली होईल आणि ती १४ मार्च २०१६ पर्यंत सुरू राहील. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम’ या तत्त्वावरील ही रोखे विक्री असून, निश्चित विक्री कालावधीआधीच भरणा पूर्ण झाल्यास रोखे विक्री त्याच क्षणी संपुष्टात येईल.
१० आणि १५ वर्षे असे रोख्यांच्या मुदतपूर्तीचे दोन कालावधीचे पर्याय नाबार्डने गुंतवणूकदारांसाठी दिले आहेत. किरकोळ व्यक्तिगत गुंतवणूकदारांसाठी १० वर्षे पर्यायात ७.२९ टक्के, तर १५ वर्षे पर्यायासाठी ७.६४ टक्के दराने व्याज परतावा देऊ करण्यात आला आहे. व्याज लाभ हा वार्षिक तत्त्वावर देय आहे. क्रिसिलने या रोखे विक्रीला ट्रिपल ए असा सर्वोच्च सुरक्षिततेचा दर्जा बहाल केला आहे.
विशेषत: सर्वोच्च कर दराच्या टप्प्यांत येणाऱ्या १० वर्षांच्या मुदत ठेवीतून करपश्चात ७ ते ७.५ टक्के दराने परतावा हाती येईल, त्या उलट नाबार्डच्या १० वर्षे मुदतीच्या करमुक्त रोख्यांचा प्रत्यक्ष प्रभावी परतावा दर हा १०.५ टक्क्य़ांच्या घरात जाणारा असेल.
तथापि आगामी काळात व्याजाचे दर हे खालावत जाणार असून, बँकांच्या ठेवींवरील व्याजाचे दरही खाली येतील. त्यामुळे गुंतवणूकदारांनी १५ वर्षे कालावधीचा आणि तुलनेने अधिक व्याज परतावा देणारा पर्याय निवडणे लाभकारक ठरेल, अशी गुंतवणूक सल्लागारांची शिफारस आहे.