गोदरेज इंडस्ट्रीज लि.चे व्यवस्थापकीय संचालक नादिर गोदरेज यांना नुकत्याच झालेल्या ऑल इंडिया लिक्विड बल्क इम्पोर्टर्स अँड एक्स्पोर्टर्स असोसिएशन (एआयएलबीआयईए)च्या शानदार समारंभात जीवनगौरव पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले. उद्योगक्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या समारंभात अदि गोदरेज यांच्या हस्ते नादिर गोदरेज यांना सन्मानित करण्यात आले. जयंत लापसिया यांच्या नेतृत्वात लिक्विड बल्क आयातदार – निर्यातदारांचा महासंघाकडून भारताचे नाव जागतिक व्यापारात उंचावण्यात आणि उद्योगक्षेत्राला एकत्र बांधून ठेवण्यात असलेल्या भूमिकेचे नादिर गोदरेज यांनी पुरस्काराला उत्तर देताना व्यक्त केलेल्या मनोगतात कौतुक केले.

कॅपजेमिनी-राज्य सरकारशी सामंजस्य
मुंबई : अग्रगण्य तंत्रज्ञान सल्लागार संस्था आणि आऊटसोर्सिग सेवा क्षेत्रातील कॅपजेमिनीने महाराष्ट्रात तरुणांमध्ये कौशल्य विकास आणि उद्योजकता प्रशिक्षणासाठी सरकारबरोबर सामंजस्याच्या करार केला आहे. राज्याच्या उद्योजकता व कौशल्य विभागाचे प्रधान सचिव एस. एस. संधू आणि कॅपजेमिनी इंडियाचेमहाव्यवस्थापक सलील पारेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी कॅपजेमिनी इंडियाचे उपाध्यक्ष व स्थानिक व्यापार सेवा विभागाचे प्रमुख किशोर चितळे हेही उपस्थित होते. राज्यातील तरुणांना नोकऱ्यांच्या दृष्टीने सक्षम बनविणे, उद्योगधंद्यांना कौशल्यपूर्णमनुष्यबळाचा पुरवठा, विविध क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाच्या अंगिकाराला प्रोत्साहन या क्षेत्रात हे सामंजस्य उपयुक्त ठरणार आहे.

हिम टेक्नो.मध्ये कॅनबँक व्हेंचर कॅपिटलचा भाग
मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेचेसाहसी भांडवली गुंतवणुकीचे अंग असलेल्या कॅनबँक व्हेन्चर कॅपिटल फंड लि. ने ३० कोटी रुपये गुंतवून हिम टेक्नोफोर्ज लि. या कंपनीतील आंशिक भांडवली हिस्सा ताब्यात घेतला आहे. कॅनबँक व्हेंचर कॅपिटलचे व्यवस्थापकीय संचालक के. भास्करन आणि हिमचे कार्यकारी संचालक राजीव अगरवाल यांनी गुरुवारी संयुक्त पत्रकार परिषदेत या व्यवहाराची घोषणा केली. हिम टेक्नोफोर्ज ही कृषी-यंत्रे, वाहन उद्योग, रेल्वे, संरक्षण तसेच तेल व वायू उद्योगात वापरात येणाऱ्या फोर्जिंग आणि मशिनमध्ये घडविलेल्या सुटय़ा भागांच्या निर्मितीतील कंपनी आहे. कॅनबँक व्हेंचर कॅपिटलने त्यांच्या इमर्जिग इंडिया ग्रोथ फंडात जमा कोषातून ही गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीद्वारे हिम टेक्नोफोर्जमधील आयएफसीआय व्हेन्चर कॅपिटलच्या भांडवली हिश्श्याची कॅनबँककडून खरीदण्यात आला आहे.