दररोज ३ लाख कोटींचे व्यवहार, १३ जणांना अटक
शेअर बाजाराला समांतर बाजार म्हणून चालणारे अवैध ‘डब्बा ट्रेडिंग’चे नागपूर शहर अड्डा बनले आहे. येथून महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, राजस्थानपर्यंत गुंतवणूकदारांसाठी ‘डब्बा ट्रेडिंग’ चालतात. संपूर्ण देशभरात या अवैध व्यापाराची रोजची उलाढाल ३ लाख कोटींच्या घरात असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या ट्रेडिंगसंदर्भात नागपूरच्या आर्थिक गुन्हे शाखेला सुगावा लागल्यावर शहरातील दहा प्रतिष्ठानांवर गुरुवारी छापे टाकण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी २० जणांविरुद्ध ८ गुन्हे दाखल करून १३ जणांना अटकही केली. हे व्यापारी दररोज १०० ते १५० कोटी रुपयांची उलाढाल करीत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर येत आहे. हे ट्रेडिंग करणारे नागपुरात असे शंभरावर दलाल आहेत. काळा पैसा गुंतविण्याचे हे प्रभावी माध्यम आहे. हे ट्रेडिंग पूर्णत: टेलिफोनवर चालते. भारतीय प्रतिभूती आणि गुंतवणूक मंडळ (सेबी) मध्ये नोंदणी करताना असे डब्बा व्यापारी ‘सेबी’ला समांतर यंत्रणा निर्माण करतात. या यंत्रणेचे संपूर्ण देशात जाळे पसरले आहे. आंतरराष्ट्रीय शेअर बाजारासह देशांतर्गत शेअर बाजारावरही लक्ष ठेवणे आणि गुंतवणूक स्वीकारण्याचे काम त्यांच्याकडून होते. याची संगणकीकृत नोंद कुठेही राहत नाही, हे विशेष! हा व्यवहार केवळ शब्दावर आणि टेलिफोनच्या माध्यमातून होतो. या व्यापारात मुळात गुंतवणूक ही नसतेच. संपूर्ण व्यापार साध्या कागदावर होत असतो. गुंतवणूकदार आणि डब्बा व्यापारी हे केवळ ‘मार्जिन मनी’ वर व्यवसाय करतात, त्यामुळे या व्यवसायात सर्वाधिक काळा पैसा वापरणे शक्य होते. नागपूर आर्थिक गुन्हे शाखा विभागाने सेबीच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने काल, गुरुवारी डब्बा व्यावसायिकांवर मोठी कारवाई केली. या व्यापाऱ्यांची मोठी श्रृंखला असून ती तोडण्याचे भलेमोठे आव्हान पोलिसांसमोर आहे, परंतु या कारवाईमुळे का होईना, देशभरातील डब्बा व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.
कारवाईचे आदेश
या व्यापारामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होतात, त्यामुळे अर्थ विभागाने सर्व राज्यांना डब्बा व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी प्रत्येक पोलीस आयुक्तांना अशा डब्बा वापाऱ्यांची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिल्यामुळे भविष्यात राज्यभरात अशा कारवाया बघावयास मिळू शकतात.

बाजारबाह्य़ सट्टाच!
खरेदी-विक्रीचे विधिवत व्यवहार होणाऱ्या बाजार व्यवस्थेला समांतर व्यवस्था निर्माण करून प्रत्यक्ष बाजार नियामक व शासनाची फसवणूक करणारी ‘डब्बा ट्रेडिंग’ ही बेकायदेशीर पद्धत आहे. बाजारात व्यवहार होणारे समभाग आणि जिनसांवर (कमॉडिटी) या पद्धतीत त्यांच्या भावावर आधारीत सट्टा लावला जातो. या बेकायदेशीर व्यवसायात व्यापारी आणि उच्चभ्रू समाजातील लोक मोठय़ा प्रमाणात गुंतलेले आहेत. अधिकृत बाजारांच्या बाहेर होणारा हा व्यवहार असल्याने शासनाकडे कोणताही कर न भरता तो बिनबोभाट चालतो.