येत्या आठवडय़ात प्रत्येकी २४५ ते २५० रुपयांना भागविक्री

प्रख्यात हृदय शल्यविशारद डॉ. देवी प्रसाद शेट्टी यांनी स्थापित केलेल्या आणि देशभरात ३१ शहरांत २३ रुग्णालये, ८ हृदयचिकित्सालये आणि २४ प्राथमिक निगा केंद्रांची शृंखला असणाऱ्या नारायण हृदयालय लिमिटेडने भांडवली बाजारात प्रवेश प्रस्तावित केला आहे. कंपनीच्या २.४५ कोटी समभागांची प्रारंभिक भागविक्री येत्या १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर दरम्यान राबविली जाणार आहे.
प्रत्येकी २४५ रु. ते २५० रु. किमतीला होत असलेल्या या भागविक्रीतून कमाल ६१३ कोटी रुपये उभारले जाणे अपेक्षित आहे. कंपनीचे प्रवर्तकांसह विद्यमान भागधारकांकडून त्यांच्याकडील भागभांडवलाची आंशिक विक्री या माध्यमातून होत आहे. भागविक्रीतून त्यांचे १३ टक्के भागभांडवल सौम्य होणार आहे. भागविक्रीपश्चात कंपनीचे समभाग हे बीएसई व एनएसई या शेअर बाजारात सूचिबद्ध होतील.
नारायण हृदयालयाने ओडिशात खासगी-सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर स्पेशालिटी रुग्णालय सुरू केले असून त्याच धर्तीवर वैष्णोदेवी येथेही नवीन रुग्णालय सुरू होऊ घातले आहे. आरोग्यनिगा क्षेत्रात खासगी-सार्वजनिक भागीदारीला देशात मोठा वाव असून, भविष्यात तशा आणखी काही संधी दिसल्यास त्या नक्कीच हेरल्या जातील, असे डॉ. देवी शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
कंपनीच्या रुग्णालय शृंखलेतून सध्या ५,४४२ बेड्स सध्या कार्यरत असून, नवीन प्रस्तावित चार रुग्णालयांची भर पडल्यास ही संख्या ६,६०२ वर जाईल. कंपनीच्या एकूण महसुलापैकी ५४ टक्के महसूल हा हृदयनिगा सेवेतून येतो.