नारायण मूर्तीसह माजी संस्थापकांची सिक्कांविरोधात एकजूट

सायरस मिस्त्री यांच्या आक्षेपाने टाटा समूहात चर्चिले गेलेल्या कंपनी सुशासनाचे पडसाद इन्फोसिसवरही आता उमटले आहेत. देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या माहिती तंत्रज्ञान कंपनीत सुशासनाचा अभाव असल्याचा आक्षेप खुद्द इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायणमूर्ती यांनी घेतला आहे.
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का यांना दिले गेलेल्या अवाढव्य वेतनवाढीबाबतच्या मूर्ती यांच्या सूरात त्यांच्या काही सह संस्थापकांनीही सूर मिसळविला आहे. यामध्ये गोपालकृष्णन, नंदन निलेकणी यांचा समावेश आहे. तर कंपनीच्या एकूण कारभाराबाबत माजी अधिकारी बालकृष्णन, मोहनदास पै यांनीही आक्षेप घेतला आहे.
कंपनीचे अध्यक्ष एस. सेशासाही यांनी मात्र कंपनीची वाटचाल सिक्का यांच्या नेतृत्वाखाली योग्यरितीने सुरू असल्याचा दावा केला आहे. कंपनीच्या संचालक मंडळावरील सदस्य सिक्का यांच्याबरोबर असल्याचेही इन्फोसिसने स्पष्ट केले आहे. कंपनीच्या एक संचालक व बायोकॉनच्या अध्यक्ष किरण मजुमदार-शॉ यांनी सिक्का यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
इन्फोसिसमध्ये संस्थापक व त्यांचे कुटुंबिय यांचा १२.७५ टक्के हिस्सा आहे. तर अन्य हिस्सा विविध फंड, विमा कंपन्या यांचा आहे. विदेशी गुंतवणूकदारांचा वाटा ३९ टक्क्यांपर्यंत आहे. मूर्ती निवृत्त झाल्यानंतर इन्फोसिसमध्ये २०१४ मध्ये सिक्का यांच्या रूपात प्रथमच समूहाबाहेरील व्यक्तीची मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली.
विशाल सिक्का व माजी मुख्य वित्तीय अधिकारी राजीव बन्सल यांचे वेतन वर्षभरात निम्म्याने वाढविल्याबद्दल नोंदविण्यात आलेल्या आक्षेपाने हा वाद सुरू झाला आहे. सिक्का यांचे मासिक वेतन ५५ टक्क्यांनी वाढून ७४ कोटी रुपये झाले. तर बन्सल यांचे वेतन १७.३८ कोटी रुपये झाले होते.
मूर्ती यांनी नुकत्याच एका इंग्रजी वित्त नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत वरिष्ठ पदावरील व्यक्तींना दिले जाणाऱ्या गलेलठ्ठ वेतनाबाबत जाहीर भाष्य केले होते. कंपनीत रसातळाला जात असलेल्या कंपनी सुशासनाबाबत आपण चिंतीत आहोत, असेही त्यांनी नमूद केले होते. वाढती कर्मचारी गळती आणि कमी महसुली उत्पन्न यांचा सामना सध्या इन्फोसिस करत आहे. चालू आर्थिक वर्षांतील तिसऱ्या तिमाहीतील वित्तीय निष्कर्षांना मंजुरी देण्यासाठी येत्या आठवडय़ात होऊ घातलेल्या कंपनीच्या संचालक मंडळ बैठकीपूर्वीच इन्फोसिस नव्या वादात सापडली आहे.

Byju India CEO Quits
बैजूजचे मुख्याधिकारी अर्जुन मोहन यांचा राजीनामा; संस्थापक रवींद्रन यांच्या हाती आता दैनंदिन कारभार
Founder and CEO of Cafe Mutual Prem Khatri
बाजारातली माणसं : फंड वितरकांचा हक्काचा माणूस- प्रेम खत्री
Goshta Asamanyanchi Dadasaheb Bhagat
गोष्ट असामान्यांची Video: इन्फोसिसमध्ये ऑफिस बाॅय ते दोन स्टार्टअप्सचा संस्थापक – दादासाहेब भगत
climate activist sonam wangchuk ends 21 day long hunger strike
वांगचूक यांचे उपोषण २१ दिवसांनंतर समाप्त