20 November 2019

News Flash

जेट एअरवेज दिवाळखोरीप्रकरणी आज सुनावणी

वैमानिक-अभियंता संघटनाही पक्षकार म्हणून सहभागास उत्सुक

वैमानिक-अभियंता संघटनाही पक्षकार म्हणून सहभागास उत्सुक

मुंबई : उड्डाणे ठप्प असलेल्या जेट एअरवेजमधील वैमानिक आणि अभियंत्यांची संघटना, त्याचप्रमाणे दोन डच सेवा प्रदात्यांनी राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरण (एनसीएलटी) पुढे सुरू असलेल्या दिवाळखोरी दाव्यात पक्षकार म्हणून सहभागाची अनुमतीसाठी बुधवारी अर्ज दाखल केला. या प्रकरणी गुरुवारपासून सुनावणी सुरू होत आहे.

तब्बल ८,५०० कर्जभार असलेल्या जेट एअरवेजला तारू शकेल असे गुंतवणूकदार स्वारस्य मिळविण्यात अपयश आल्याने, स्टेट बँकेच्या नेतृत्वात २६ बँकांच्या संघाने एनसीएलटीच्या मुंबई पीठापुढे मंगळवारी दिवाळखोरी दाखल केला आहे. परिचालनाचा खर्च चालविण्याइतका निधी नसल्याने कंपनीची उड्डाणे १७ एप्रिलपासून पूर्णपणे ठप्प आहेत.

या दिवाळखोरी दाव्यात, गत डिसेंबरपासून आंशिक वेतनावर गुजराण करीत असलेल्या तब्बल १०,००० कोटी रुपयांचे वेतन थकीत जेट एअरवेजच्या वैमानिक आणि अभियंत्यांनाही एक पक्षकार म्हणून सहभागी करावे, असा त्यांच्या संघटनांकडून अर्ज करण्यात आला आहे. कंपनीने २३,००० कर्मचाऱ्यांना मार्च २०१९ पासून वेतन दिलेले नसून, ही थकबाकी आणखी ३,००० कोटी रुपयांची आहे. नेदरलँडमधील जेटला दळणवळण सेवा पुरविणाऱ्या दोन कंपन्यांनी थकीत देणी वसूल करण्यासाठी पक्षकार म्हणून सहभागाचा अर्ज केला आहे. या कंपन्यांची नावे मात्र कळू शकलेली नाहीत.

सरलेल्या मार्च महिन्यात नेदरलँडस्थित कंपन्यांनी जेटकडे थकलेल्या पैशाच्या वसुलीसाठी तिचे एक प्रवासी विमान ताब्यात घेतले असून, तेथील स्थानिक न्यायाधिकरणाकडे मे महिन्यात दिवाळखोरी दावा दाखल केला आहे. या सर्व अर्जाची एनसीएलटीच्या मुंबई पीठाचे व्ही. पी. सिंग आणि रविकुमार दुराईसामी यांच्याकडून गुरुवारी होत असलेल्या सुनावणीत दखल घेतली जाणे अपेक्षित आहे.

शिवाय अनुक्रमे ८.७४ कोटी रुपये आणि ५३ लाख रुपयांची देणी थकीत असलेल्या शमन व्हील्स आणि गॅगर एंटरप्रायजेस या दोन देणेकऱ्यांनी बँकांच्या संघांच्या आधी म्हणजे १० जूनलाच जेट एअरवेजच्या दिवाळखोरीचा दावा दाखल केला आहे. त्या दाव्याचीही गुरुवारीच पीठाकडून सुनावणी होणार आहे.

समभागात पडझड सुरूच.

कर्जदात्या बँकांकडून दिवाळखोरीचा दावा केला गेल्यापासून जेट एअरवेजच्या समभागमूल्यात निरंतर घसरण सुरू असून, बुधवारच्या भांडवली बाजारातील व्यवहारात त्यात आणखी १८.५ टक्क्यांचा ऱ्हास दिसून आला. सलग १३ व्या दिवशी सुरू राहिलेल्या पडझडीत समभागमूल्य तब्बल ७८ टक्क्यांनी धुपले आहे. बुधवारी मुंबई शेअर बाजारातील व्यवहार थंडावले तेव्हा समभाग १८.१७ टक्के घसरणीसह ३३.१० रुपयांवर स्थिरावला होता.

‘मोझर बेअर सोलर’ही अवसायनात!

नवी दिल्ली : कर्जबाजारी मोझर बेअर सोलर कंपनीसंबंधाने कायद्याने विहित २७० दिवसांच्या मुदतीत कोणताही समाधानकारक मार्ग पुढे येऊ न शकल्याने, राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरणाने अखेर ही कंपनी अवसायनात काढण्याच्या प्रक्रियेचे बुधवारी आदेश दिले. संगणकीय साठवण साधने विकसित करणाऱ्या मोझर बेअर इंडिया लिमिटेडची ही उपकंपनी असून, या पालक कंपनीबाबत यापूर्वीच मोडीत काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या दोन्ही घटना कर्जदात्या बँकांसाठी धक्कादायक आहेत. मोझर बेअर सोलरचे अवसायक मूल्य हे ७२.४ कोटी रुपये अंदाजण्यात आले आहे, जे कंपनीकडे थकीत कर्जरकमेच्या तुलनेत खूपच अत्यल्प आहे.

First Published on June 20, 2019 3:53 am

Web Title: national company law tribunal will hear jet airways insolvency case today
Just Now!
X